पीएम किसानच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देणे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 14:54 IST2025-04-07T14:51:01+5:302025-04-07T14:54:00+5:30

महिलांमध्ये नाराजीचा सूर : २१०० रुपयांचे वाढीव अनुदान अजूनही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना देण्यात आलेले नाही.

PM Kisan beneficiaries stopped receiving benefits of Ladki Bhain Yojana | पीएम किसानच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देणे बंद

PM Kisan beneficiaries stopped receiving benefits of Ladki Bhain Yojana

शशिकांत गणवीर 
लोकमत न्यूज नेटवर्क
भेजगाव :
विधानसभा निवडणुकापूर्वी शासनाने मोठा गाजावाजा करीत महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. कोणत्याही जास्त कठीण अटी न ठेवता सुरुवातीला ही योजना राबविली गेल्याने महिला सुखावल्या. याचाच फायदा महायुतीला सत्ता स्थापनेसाठी झाला. असे असताना शासनाने रंग बदलविणे सुरू केले असून दररोज नवनवीन नियम लावून लाभार्थ्यांची संख्या कमी करीत असल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेतकऱ्यांसाठी ड्रीम योजना असलेली केंद्र व राज्य पुरस्कृत पीएम किसान योजनेत अनेक महिला लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचे हप्ते मिळतात. मात्र, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसून हुलकावणी देत असल्याने महिलांमध्ये नाराजीचा सूर आहे. पीएम किसान व लाडकी बहीण योजना या वेगवेगळ्या योजना असून यांचा परस्पर तीळमात्र संबंध नसताना व तसे कोणतेही परिपत्रक नसताना महिलांना लाभापासून वंचित ठेवल्या जात आहे.


२१०० रुपयांचे काय झाले ?
विधानसभा निवडणुकापूर्वी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत महिलांना प्रति महिना १५०० रुपये मिळतात. मात्र, सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने निवडणुकांमध्ये २१०० रुपये करण्याचे जाहीरनाम्यात सांगून महिलांची मते मिळवली. मात्र, निवडणुका होऊन सत्तेवर आलेल्या महायुती सरकारला महिलांना २१०० रुपये देण्याचा विसर पडल्याचे चित्र आहे. या योजनेत वाढीव अनुदान मिळत नसल्याने निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन गाजर ठरणार नाही ना, अशी शंका महिला व्यक्त करीत आहेत. महिलांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून सुरू केलेल्या या योजनेत सर्व समावेशक महिलांना लाभ मिळावा व २१०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी महिलांकडून होत आहे.


"मला लाडकी बहीण योजनेचे सुरुवातीला पंधराशे रुपये मिळाले. मात्र, मला आता पीएम किसान योजना सुरू झाल्याने मला लाडकी बहीण योजनेचे केवळ पाचशे रुपये जमा झाले."
- लता आकुलवार, लाभार्थी गडिसुर्ला


"मला मागील दोन वर्षांपासून पीएम किसान योजनेचे अनुदान मिळत आहे. मी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरूनही मला लाडकी बहीण योजनेचा लाभमिळाला नाही."
- विजया गणवीर, लाभार्थी, भेजगाव

Web Title: PM Kisan beneficiaries stopped receiving benefits of Ladki Bhain Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.