सेवानिवृत्तीच्या एक दिवसअगोदर वेकोलि कर्मचाऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 18:11 IST2023-01-30T18:10:53+5:302023-01-30T18:11:42+5:30
झुडपामध्ये ते गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले

सेवानिवृत्तीच्या एक दिवसअगोदर वेकोलि कर्मचाऱ्याची आत्महत्या
चंद्रपूर : सेवानिवृत्तीच्या एक दिवसअगोदर वेकोलि कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. २९) उघडकीस आली. दिवाकर तुकाराम जेंगरे (५९) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हिंग्लाज भवानी वाॅर्डातील रहिवासी असलेले दिवाकर तुकाराम जेंगरे हे वेकोलिमध्ये कार्यरत होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कामावर जातो, असे सांगून ते घरातून निघाले मात्र घरी पोहोचलेच नाही. कुटुंबीयांनी याबाबत शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली होती. दरम्यान, रविवारी नांदगाव कोळसा खाणीजवळ असलेल्या वर्कशाॅपजवळील झुडपामध्ये ते गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले.
३१ जानेवारीला ते सेवानिवृत्त होणार होते. मात्र त्यापूर्वीच टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच वेकोलिच्या एका अधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. घटनेचा पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.