ब्रह्मपुरीतील 'त्या' देहविक्री प्रकरणात आणखी सात लोकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 15:12 IST2022-09-27T15:11:07+5:302022-09-27T15:12:30+5:30
वडसा, लाखांदूर येथील आरोपींचा समावेश, आरोपी वाढणार

ब्रह्मपुरीतील 'त्या' देहविक्री प्रकरणात आणखी सात लोकांना अटक
ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : येथील देहविक्री प्रकरणात ब्रह्मपुरी पोलिसांनी तपासामध्ये आतापर्यंत एकूण नऊ लोकांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करून अटक केली आहे. यात सुरुवातीला पती-पत्नी यांना तर मागील दोन दिवसांत एकूण सात लोकांना अटक करण्यात आली आहे. यात लाखांदूर येथील तीन तर वडसा येथील चार आरोपींचा यात समावेश असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यादव यांनी दिली.
कलकत्ता येथून अपहरण करून एका अल्पवयीन मुलीला ब्रह्मपुरीला आणून विदर्भ इस्टेट कॉलनीत एक किरायचे घर घेऊन राहणारे लोणारे दाम्पत्य तिच्याकडून देहविक्री करीत असल्याचे नागपूर येथील एका सामाजिक संस्थेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सापळा रचून लोणारे दाम्पत्याच्या तावडीतून (दि.१७) मुलीला सोडविण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी मानव तस्करी अधीनियम,पोस्को, पिटा ॲक्टअंतर्गत नोंद करून मुख्य आरोपी मंजित रामचंद्र लोणारे (४०) व चंदा मंजित लोणारे (३२) यांना अटक केली.
मुख्य आरोपींची पोलीस कोठडीत विचारपूस केली असता त्यांच्या बयाणावरून वडसा येथील अरविंद इंदूरकर (४७), शिवराम हाके (४०), राजकुमार उंदिरवाडे (४२), मुकेश बुराडे (२८) तर लाखांदूर येथील प्रकाश परशुरामकर (३५), सौरभ बोरकर (२२), गौरव हरिणखेडे (२८) या लोकांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणात अटक केली आहे. सदर प्रकरणात सर्व आरोपींवर पास्को, पिटा या कलमासह ३७६, ३७६ (३) या कलमाची वाढ केली आहे. सध्या सर्व नऊ आरोपी हे न्यायालयीन कोठडीत असून प्राप्त माहितीनुसार तपास आणखी वाढणार असून या प्रकरणात आणखी अनेक आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.