चंद्रपूरात 'मिडलँड स्टोन' कंपनीचा बनावट रॉयल्टी क्लिअरन्स प्रमाणपत्राचा वापर; दीड कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:10 IST2025-06-04T16:08:58+5:302025-06-04T16:10:47+5:30

Chandrapur : बनावट 'लेटरपॅड' व 'रॉयल्टी क्लिअरन्स' आधारे केली फसवणूक

'Midland Stone' company used fake royalty clearance certificate in Chandrapur; Fraud of Rs 1.5 crore | चंद्रपूरात 'मिडलँड स्टोन' कंपनीचा बनावट रॉयल्टी क्लिअरन्स प्रमाणपत्राचा वापर; दीड कोटींची फसवणूक

'Midland Stone' company used fake royalty clearance certificate in Chandrapur; Fraud of Rs 1.5 crore

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
नागपुरातील मे. मिडलँड स्टोन कंपनीने चंद्रपूर जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाचे बनावट 'लेटरपॅड' व स्वाक्षरी करून 'रॉयल्टी क्लिअरन्स' प्रमाणपत्राच्या आधारे सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा खनिकर्म अधिकारी नैताम यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


नागपुरातील मे. मिडलँड स्टोन कंपनी मध्य रेल्वेत गौण खनिज पुरवठ्याचे काम करते. उपमुख्य अभियंता मध्य रेल्वे, वर्धा यांच्याकडे गौण खनिज पुरवठ्याचे काम कंपनीने पूर्ण केले. शासकीय बांधकामात वापरल्या जाणाऱ्या गौण खनिजाच्या स्वामित्वधनाबाबत जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाकडून परवानगी घेतली जाते.


स्वामित्वधन भरल्यानंतर वाहतूक परवाना जारी होतो. हे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून कंत्राटदाराची देयके अदा करताना गौण खनिज अधिकृतपणे वापरल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाकडून 'रॉयल्टी क्लिअरन्स' प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. त्या आधारे शासकीय यंत्रणा कंत्राटदाराच्या देयकामधून स्वामित्वधनाची रक्कम संबंधित कंत्राटदारास उपलब्ध करून देते.


असे उघडकीस आले प्रकरण
मिडलँड स्टोन कंपनीने स्वामित्वधनाची जवळपास दीड कोटी रुपयांची रक्कम मिळावी, यासाठी चंद्रपूर जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाचे अनधिकृत 'लेटरपॅड' तयार करून खोट्या 'रॉयल्टी क्लिअरन्स' प्रमाणपत्रावर जिल्हा खनिकर्म अधिकारी नैताम यांची बनावट स्वाक्षरी केली. अनधिकृत शिक्का मारून ही कागदपत्रे उपअभियंता, मध्य रेल्वे, वर्धा कार्यालयात सादर केली. उपअभियंता मध्य रेल्वे यांनी पडताळणीसाठी चंद्रपूरचे जिल्हा खनिकर्म अधिकारी नैताम यांच्याकडे कागदपत्रे पाठविली. कागदपत्रे बघताच स्वाक्षरी, कार्यालयाचे लेटरपॅड, शिक्का व रॉयल्टी क्लिअरन्स प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले. 


"जिल्हा खनिकर्म विभागाने रामनगर पोलिस ठाण्यात पत्र दिले आहे. तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती पुन्हा पुरवावी, असे त्यांना कळविले आहे."
- सुधाकर यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी, चंद्रपूर

Web Title: 'Midland Stone' company used fake royalty clearance certificate in Chandrapur; Fraud of Rs 1.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.