मराठा आरक्षण: चंद्रपुरात आतापर्यंत ५६ हजार २४६ कुटुंबाचे सर्वेक्षण, आज शेवटचा दिवस

By राजेश मडावी | Published: February 1, 2024 04:11 PM2024-02-01T16:11:18+5:302024-02-01T16:11:44+5:30

सर्वेक्षण झाले नसल्यास संपर्क साधण्याचे मनपाचे आवाहन

Maratha Reservation: Survey of 56 thousand 246 families in Chandrapur so far, today is the last day | मराठा आरक्षण: चंद्रपुरात आतापर्यंत ५६ हजार २४६ कुटुंबाचे सर्वेक्षण, आज शेवटचा दिवस

मराठा आरक्षण: चंद्रपुरात आतापर्यंत ५६ हजार २४६ कुटुंबाचे सर्वेक्षण, आज शेवटचा दिवस

राजेश मडावी/ चंद्रपूर: शहरातील मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले. चंद्रपूर महानगरपालिकेने आतापर्यंत ५६ हजार २४६ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण केले. मनपा हद्दीतील सर्व निवासी कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू असून भाडेकरू कुटुंबाचेही सर्वेक्षण करण्याच्या सूचना संबंधित प्रगणकांना देण्यात आल्या. ज्या कुटुंबांचे सर्वेक्षण १ फेब्रुवारीपर्यंत होऊ शकले नाही, अशा कुटुंबप्रमुखांनी मनपा मुख्य झोन कार्यालय, क्षेत्रीय कर निरीक्षक अथवा मनपा मुख्य झोन कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेने केले आहे.

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी २३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणास आता २ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली. सर्वेक्षण युद्धपातळीवर करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ४९ पर्यवेक्षक व ७३९ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली असून, सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरासुद्धा घरोघरी जाऊन कुटुंबांची माहिती घेत आहेत. शहरात सर्वेक्षण होत असल्याची माहिती ध्वनी यंत्रणा, वृत्तपत्रे, समाजमाध्यमांद्वारे सर्वत्र देण्यात आली. प्रत्येक प्रगणकाद्वारे सरासरी १०० घरांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी, उपलब्ध मनुष्यबळ इत्यादींचा सामना करीत मनपा व इतर शासकीय कर्मचारी हे पूर्ण क्षमतेने कार्य करत आहेत. सर्वेक्षणादरम्यान जर कुठल्या कुटुंबाचे सर्वेक्षण अद्याप झाले नसेल किंवा त्या कालावधीत ते घरी नसतील अथवा इतर कुठल्याही कारणाने सर्वेक्षण झाले नसेल तर अशा कुटुंबप्रमुखांनी आपले क्षेत्रीय कार्यालय किंवा आपल्या क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त, कर निरीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Web Title: Maratha Reservation: Survey of 56 thousand 246 families in Chandrapur so far, today is the last day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.