युवकांवर कोसळली वीज; एकाचा मृत्यू, पाच जण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 12:43 IST2023-06-13T12:43:24+5:302023-06-13T12:43:43+5:30
गप्पा करत असतानाच घाला

युवकांवर कोसळली वीज; एकाचा मृत्यू, पाच जण गंभीर
भेजगाव (चंद्रपूर) : मूल तालुक्यातील चांदापूर हेटी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागे चिंचेच्या झाडाखाली पाच सहा युवक गप्पागोष्टीत दंग होते. अचानक त्यांच्यावर वीज कोसळली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर अन्य पाच जण गंभीर जखमी झालेत. ही घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान घडली.
चिंचेच्या झाडाखाली गावातील पाच-सहा मित्र चर्चेत दंग होते. याचदरम्यान ढगाळ वातावरण तयार झाले आणि अचानक या युवकांवर वीज कोसळली. यात एकाचा मृत्यू झाला. प्रमोद लाटेवार (रा. चांदापूर हेटी) असे मृत युवकाचे नाव आहे. बाळ तिवाडे, संजय नरुले, येलप्पा श्रीगिरवार, विनोद पाल, वसंत तिवाडे हे युवक गंभीर जखमी झाल्याने त्यांना सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा तपास मूल पोलिस करीत आहेत.