तुरीची मळणी करताना मजूर थ्रेशरमध्ये सापडला, जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 14:02 IST2023-02-04T13:56:29+5:302023-02-04T14:02:23+5:30
चेक नवेगाव येथील घटना

तुरीची मळणी करताना मजूर थ्रेशरमध्ये सापडला, जागीच मृत्यू
पोंभुर्णा (चंद्रपूर) : तालुक्यातील चेक नवेगाव येथे तुरीची मळणी करीत असताना एका मजुराचा थ्रेशरमध्ये हात गेल्याने थेट मानेपर्यंत तो ओढला गेला. यात त्या युवक मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
मृतकाचे नाव महेश अरुण लोहे (२२) असे असून, तो चेक नवेगाव येथील रहिवासी आहे. पोंभुर्णा तालुक्यातील चेक नवेगाव येथील शांताराम कन्नाके यांच्या शेतामधील तूर काढण्यासाठी आष्टा येथील विजय बोढेकार यांच्या मालकीचे थ्रेशर मशीन लावण्यात आली होती. चार मजूर कामावर होते. महेश तुरीची पेंडी टाकत असताना उजवा हात मशीनमध्ये सापडल्याने तो ओढल्या गेला व मानेपर्यंतचा भाग मशीनमध्ये दबून त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोंभूर्णा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोंभुर्णा पोलीस करीत आहेत.