रेती तस्करांनी पोखरला वर्धा नदीचा कढोली-धिडसी घाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 17:46 IST2024-04-30T17:45:40+5:302024-04-30T17:46:08+5:30
निवडणूक आटोपूनही यंत्रणा ढिम्म: नदीपात्रात रात्रभर ट्रॅक्टरचा आवाज

रेती तस्करांनी पोखरला वर्धा नदीचा कढोली-धिडसी घाट
लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती : कोरपना-राजुरा तालुक्याच्या सीमावर्ती भागातून वाहत असलेल्या वर्धा नदीच्या कढोली, धिडशी घाटावर रेती तस्करांचा धुमाकूळ सुरू आहे. रात्रभर ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजात वर्धा नदी अक्षरशः पोखरली जात असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.
राजुरा तालुक्यातील वर्धा नदीच्या धिडशी घाटावरून परिसरातील रेती तस्करी जोरात सुरू आहे. कढोली घाटातही हीच परिस्थिती असून, ट्रॅक्टरने रात्रंदिवस रेतीची खुलेआम तस्करी केली जात आहे. रेती वाहतुकीचा मार्ग कढोली गावातून असल्याने गावातील नागरिकांना ट्रॅक्टरचा आवाज व धुळीचा प्रचंड त्रास होत आहे.
रात्रंदिवस भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने अपघाताची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे. राजकीय सलगी असलेले स्थानिक नेते तस्करीत गुंतल्याने महसूल विभागाचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत, असा आरोप नागरिकांनी केला. कढोली घाटावरून सर्वाधिक रेती तस्करी होत असल्याने कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरांना रेतीचा पुरवठा
कोरपना व राजुरा तालुक्यात मोठे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे अमर्यादपणे रेतीचा अवैधपणे उपसा होत आहे. या व्यवसायात अत्याधुनिक यंत्राचा वापर रेती तस्करांकडून केला जात असून, यात जेसीबी व ट्रॅक्टरच्या मदतीने नदीपात्रातील रेतीचा उपसा करून मोठमोठ्या टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे शहराकडे पाठविली जाते
उपजई घाटावरील वाहतुकीने रस्त्यांची ऐसीतैशी
कढोलीपासून एक किमी अंतरावर उपजई घाटावरूनही रात्रंदिवस रेतीची वाहतूक सुरू असते. त्यामुळे परिसरातील रस्त्यांची ऐसीतेंशी झाली. धिडशी व कढोली घाटातील निघणाऱ्या ट्रॅक्टरमुळे रस्त्यांची वाट लागली.