पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे सुरक्षित की धोक्याचे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 18:53 IST2024-07-26T18:52:04+5:302024-07-26T18:53:18+5:30
Chandrapur : दीर्घकाळ वापराने संसर्गाचा धोका

Is it safe or dangerous to use contact lenses in rainy season?
चंद्रपूर : दूषित पाणी डोळ्याला लागल्यामुळे डोळ्याचा लेप्टोस्पायरोसिस होऊ शकतो. त्यामुळे विशेषकरून पावसाळ्यात कोणतेही दूषित पाणी डोळ्यात जाणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे. या काळात शक्यतो कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करू नये, त्यामुळे डोळ्यांचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.
कॉन्टॅक्ट लेन्स टाळणेच बरे
- कॉन्टॅक्ट लेन्समुळे संसर्ग होण्याची अनेक कारणे आहेत. पावसाळ्यात अकाथामोएबा नावाचे छोटे जीव पाण्यात राहतात.
- पाण्यात कॉन्टैक्ट लेन्स घातल्यास ते डोळ्यांना सहज संक्रमित करू शकतात. त्यामुळे फॉन्टॅक्ट लेन्स वापरणे टाळावे.
पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल?
- लेन्स डोळ्यात लावण्यापूर्वी आणि वापर करून झाल्यानंतर नेहमी द्रावणाने स्वच्छ कराव्यात.
- लेन्स लावल्यामुळे जळजळ किंवा इतर कोणतीही समस्या जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये, लेन्स पावसात भिजणार नाही, याची काळजी घ्यावी. अस्वच्छ हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे.
लेन्स वापरणे आवश्यक असेल तर...
- कॉन्टॅक्ट लेन्स दीर्घकाळ वापरू नये. काम पूर्ण झाल्यावर काढून ठेवाव्यात. त्याचा दीर्घकाळ वापर डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतो.
- लेन्स जमिनीवर पडली तर ती तशीच डोळ्यांत घालू नये. कारण अनेक प्रकारचे जंतू त्यात प्रवेश करतात, ज्यामुळे डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो.
पावसाळ्यात विषाणू संसर्गाचा धोका
काहींना पावसात ओलावा आणि पाण्यामुळे चष्मा घालण्याचा त्रास होतो. यामुळे ते चष्म्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. पण पावसात कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्याने संसर्ग होण्याचा धोका असतो. पावसाळ्यात बॅक्टेरियासह अनेक प्रकारचे विषाणू आक्रमण करतात, त्यामुळे डोळ्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो.
"कॉन्टैक्ट लेन्समुळे डोळ्याचा संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे पावसाच्या दिवसात लेन्स वापरू नये. अगदी गरजच असेल तर योग्य ती काळजी घेऊन वापरावी. दूषित पाण्याचा संपर्क आल्यास संसर्ग होऊ शकतो."
-डॉ. चेतन खुटेमाटे, नेत्ररोगतज्डा, चंद्रपूर