गोंडपिंपरीत भीषण अपघात! ट्रकच्या धडकेत मजुराचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 18:13 IST2025-08-05T18:11:57+5:302025-08-05T18:13:46+5:30

जखमींना एक तास रुग्णवाहिकेची वाट : गोंडपिंपरीत आरोग्य व्यवस्था उघडी पडली

Horrific accident in Gondpimpri! Laborer dies, three seriously injured in truck collision | गोंडपिंपरीत भीषण अपघात! ट्रकच्या धडकेत मजुराचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Horrific accident in Gondpimpri! Laborer dies, three seriously injured in truck collision

गोंडपिंपरी : शहरातील हिती कॉटन जिनिंगसमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मजुरांना चिरडून दुचाकीला धडकल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. ही भीषण घटना सोमवारी (दि. ४) दुपारी २ वाजता घडली. अजय सुबोधसिंग मंडल (वय ३२, रा. लक्ष्मीपूर बिहार) असे मृतकाचे नाव आहे. गंभीर जखमी मनोजकुमार दिनेश मंडल (३५, रा. भवानीपूर), केदार तिथर मंडल (३५, रा. सुपली, बिहार) व साईनाथ दाऊजी कोहपरे (३५, रा. वढोली) यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेनंतर पळून जाणाऱ्या चालकाला संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.


तेलंगणा राज्यातून सीजीओ ७ ए डब्लू ७८३९ क्रमांकाचा भरधाव ट्रक रायपूर (भिलाई) कडे निघाला होता. गोंडपिंपरी शहरात प्रवेश केल्यानंतरही चालकाने वेग कमी केला नाही. हिती कॉटन जिनिंगसमोर धान्य व्यापारी हनुमंतु झाडे यांचे गोदाम आहे. या गोदामाकडे जाण्यासाठी चार मजूर रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याच ठिकाणी साईनाथ कोहपरे हा दुचाकीधारक मजुरांसोबत बोलत होत असताना भरधाव ट्रकने दुचाकीला धडक देऊन चौघांना चिरडले. यामध्ये अजय मंडल याचा जागीच मृत्यू झाला. मनोजकुमार मंडल, केदार मंडल व साईनाथ कोहपरे हे तिघे गंभीर जखमी झाले. ट्रकच्या अॅगलला एक मजूर अडकून असतानाही चालकाने पुन्हा वेग वाढवून आष्टी मार्गे वाहन दामटले. नागरिकांनी हे थरार दृश्य पाहताच मोठ्या हिमतीने ट्रकला अडविला व हवा सोडली. दरम्यान, घटनास्थळी पोलिस दाखल होताच चालकाला त्यांच्याकडे स्वाधीन केले. घटनास्थळावर मोठी गर्दी झाल्याने तणाव निर्माण झाला होता. ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पोलिस उपनिरीक्षक मंगेश कराडे पथकाने जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. ट्रकचालक संतोषकुमार भिरेंद्र राम (३६, रा. कारो उत्तर प्रदेश) याला अटक केली. पुढील तपास गोंडपिंपरी पोलिस करत आहेत. 


रुग्णवाहिका परत मागितली
यापूर्वी सुरजागडच्या वाहनांमुळे अपघात झाले. त्यामुळे सुरजागड येथील कंपनीने नागरिकांसाठी एक स्वतंत्र रुग्णवाहिका गोंडपिंपरी पोलिस ठाण्याला दिली होती. मात्र, ती परत मागून कोठारी पोलिस ठाण्याला दिली. वारंवार अपघात होत असताना गोंडपिंपरी ठाण्यात रुग्णवाहिका का नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. 


जखमींची एक तास ताटकळ
गोंडपिंपरी तालुक्यात ग्रामीण रुग्णालय अंतर्गत केवळ चार रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी तीन रुग्णवाहिका या गरोदर मातांसाठी राखीव असतात. एक रुग्णवाहिका १०८ ही कुठेही पाठवली जाते. भीषण अपघातात तिघे जखमी झाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविणे गरजेचे असताना रुग्णवाहिकेअभावी एक तास ग्रामीण रुग्णालयातच ताटकळत राहावे लागले. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Web Title: Horrific accident in Gondpimpri! Laborer dies, three seriously injured in truck collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.