दिवाळीच्या सुट्टीत गावाला जाताय; मग पोलिसांना माहिती द्या !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 14:38 IST2024-10-30T14:36:09+5:302024-10-30T14:38:17+5:30
चंद्रपूर पोलिसांचे आवाहन : कुलूपबंद घरे करतात चोरटे लक्ष्य

Going to the village during Diwali vacation; Then inform the police!
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दिवाळीला सुरुवात झाली आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्या लागल्या आहेत. दिवाळीच्या सुट्टयांत अनेक जण बाहेरगावी जाण्याचा बेत आखत आहेत. मात्र, दरवर्षीच चोरटे बंद घराला लक्ष्य करीत असल्याचे समोर आले आहे. यासाठी बाहेरगावी जाताना पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दिवाळी हा सण सर्वात मोठा सण आहे. या काळात सर्वच विभागाला सुट्टया असतात. विशेषतः शाळा- महाविद्यालयाला सुट्ट्या असतात. अनेक जण नोकरी, व्यवसाय, मुलांच्या शिक्षणासाठी मूळ गावाऐवजी शहरात राहतात. दिवाळीत बहुतेक जण गावाला येतात. काहीजण राज्यात, परराज्यात किंवा अगदी विदेशात फिरायला जाण्याचा बेत आखतात. परंतु, सुट्टीच्या काळात बाहेरगावी जाताना घराच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन केले आहे.
सुरक्षेची काळजी घ्या
घरात कोणीही नसताना घरातील मौल्यवान वस्तू, पैशांची काळजी घेणेही आवश्यक आहे. म्हणूनच बाहेरगावी जाताना घराला कुलूप व्यवस्थित लावले असावे. सुरक्षेसाठी आवश्यक यंत्रणा असायला हवी, असा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला आहे.
बाहेरगावी जाण्याआधी असे करावे नियोजन
- बाहेरगावी जाताना बंद घरात दागिने, पैसे, किमती वस्तू घरात न ठेवता बँक लॉकरमध्ये ठेवा.
- शेजाऱ्यांना माहिती द्या. ३ ते ४ घरांनी मिळून एखादा गुरखा नेमावा.
- बाहेरगावी जात असल्याची माहिती पोलिसांना द्यावी, गस्तीवरील पोलिस कर्मचाऱ्यांचा संपर्क क्रमांक घ्यावा.
- कॉलनी किंवा परिसरात संशयित आढळल्यास पोलिसांना कळवा. अलार्मसारखी एखादी बेल बसवा.
- बंद घराच्या परिसरातील लाइट सुरू ठेवा.
पोलिसांकडून जनजागृती
कुलूपबंद घराला चोरटे लक्ष्य करत असल्याचे आजपर्यंतच्या घटनावरून दिसून आले आहे. त्यामुळे चोरी, घरफोडी यासारख्या घटना घडू नयेत, यासाठी नागरिकांनी बाहेरगावी जाताना जवळील पोलिसांना माहिती द्यावी, तसेच शेजाऱ्याला कळवावे. घरी मौल्यवान वस्तू व दागिने ठेवू नये, लॉकरमध्ये ठेवावे, अशी जनजागृती पोलिसांकडून करण्यात येत आहे.