राज्यातील ८४ हजार शाळांचे जीआयएस मॅपिंग रखडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 11:26 IST2025-04-22T11:25:04+5:302025-04-22T11:26:28+5:30
तांत्रिक अडचणींचा फटका : एकाच दिवशी करायचे होते जीआयएस मॅपिंग

GIS mapping of 84,000 schools in the state stalled
परिमल डोहणे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासनाच्या आदेशानुसार दि. १९ एप्रिल रोजी राज्यभरातील सर्व यू-डायस क्रमांक असलेल्या शाळांचे जीआयएस (भौगोलिक माहिती प्रणाली) मॅपिंग करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात मॅपिंग करताना अनेक तांत्रिक अडचणी आल्यामुळे ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर रखडली आहे. राज्यातील एकूण एक लाख आठ हजार ३०१ शाळांपैकी केवळ २३ हजार ६०५ शाळांचेच मॅपिंग पूर्ण झाले असून, तब्बल ८४,६९६ शाळांचे जीआयएस मॅपिंग अद्याप अपूर्ण आहे.
शालेय भौतिक सुविधा तपासणी अंतर्गत राज्यातील सर्व यू-डायस क्रमांक असलेल्या शाळांचे 'महास्कूल जीआयएस १.०' अॅपद्वारे मॅपिंग दि. १९ एप्रिल रोजी एकाच दिवशी करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले होते. यासाठी दि. १७ एप्रिल रोजी ऑनलाइन बैठक घेऊन सविस्तर सूचना देण्यात आल्या होत्या. या निर्देशानुसार जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्रप्रमुखांमार्फत सर्व मुख्याध्यापकांना मॅपिंगबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र शनिवारी प्रत्यक्ष अंमलबजावणी दरम्यान राज्यभरातील अनेक शाळांमध्ये अॅपमध्ये अडथळे, सर्व्हर समस्या आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण जाणवली. या तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील केवळ २३,६०५ शाळांचेच जीआयएस मॅपिंग पूर्ण झाले असून, उर्वरित ८४,६९६ शाळांचे मॅपिंग रखडले आहे. यामुळे अनेक मुख्याध्यापक संभ्रमात असून, पुढील मॅपिंग कधी व कशा पद्धतीने करायचे, याची स्पष्टता अद्याप शिक्षण विभागाकडून मिळालेली नाही.
फोटो अपलोड करायचा कसा?
जीआयएस मॅपिंग करताना शाळेचा फ्रंट व्हा, जनरल व्हा, किचन शेड, पिण्याचे पाणी, मुला-मुलींचे शौचालय अशा विविध सुविधांचे फोटो, जिओ टॅग करून अपलोड करणे बंधनकारक होते; मात्र अद्यापही राज्यातील अनेक शाळेत या सुविधा नाहीत. त्यामुळे फोटो अपलोड करायचा कसा? असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.
अशी आहे मॅपिंग रखडलेल्या जिल्ह्यांची स्थिती
अकोला १७३९, अमरावती २४०४, भंडारा ८५०, बीड २८६३, बुलढाणा १९१४, चंद्रपूर २१०६, छ. संभाजीनगर ३३४१, धाराशिव १२६२, धुळे १७६५, गडचिरोली १७४९, गोंदिया १२०६, हिंगोली १२०८, जळगाव २७९५, अहमदनगर ३७९७, जालना १८६८, कोल्हापूर २९०९, लातूर २०६७, मुंबई २३०७, मुंबई-११,४२७, नागपूर ३०२२, नंदुरबार १८८९, नाशिक ४८५५, पालघर २६८५, परभणी १७०९, पुणे ५८२१, रायगड २६९०, रत्नागिरी १९५८, सांगली १९०१, सातारा २२३१, सिंधुदुर्ग ९६८, सोलापूर ३३०३, ठाणे ३९७२, वर्धा १०२८, वाशिम १०५३, यवतमाळ २६७५.
राज्यातील अनेक शिक्षक व मुख्याध्यापकांना अचानक आलेल्या सूचनांमुळे अॅप डाऊनलोड करणे आणि वापरणे अवघड गेले. विशेष म्हणजे 'महा स्कूल जीआयएस १.०' हे अॅप कोणत्याही अधिकृत प्ले स्टोअरवर उपलब्ध नव्हते, त्यामुळे अॅप इंस्टॉल व लॉगिन करताना अडचणी निर्माण झाल्या. अनेक मुख्याध्यापकांच्या यू-डायस प्रोफाइलमध्ये मोबाइल क्रमांक अपडेट नसल्यामुळे ओटीपी (वनटाइम पासवर्ड) येत नव्हता. राज्यभरात एकाच दिवशी, एकाच वेळी शेकडो शिक्षकांनी अॅपचा वापर केल्याने सर्व्हर सतत डाऊन होत होता. अॅप हँग होणे, फोटो अपलोड न होणे, स्थानिक डेटा सेव्ह न होणे अशा तांत्रिक अडचणी वारंवार भासत होत्या.
"दि. १९ एप्रिल रोजी जिल्ह्यातील शाळांचे जीआयएस मॅपिंग करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. मॅपिंगदरम्यान अनेक अडचणी आल्या. काही शाळांची मॅपिंग झाली आहे. उर्वरित शाळांचे काय करायचे याबाबत नव्या सूचना आल्यानंतरच कळेल."
- अश्विनी सोनवाने शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि. प. चंद्रपूर