खूशखबर ! विदेशी रुबाबदार ‘राजहंस’ अवतरले सावरगावच्या तलावात !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 15:35 IST2023-03-27T15:33:31+5:302023-03-27T15:35:27+5:30
पक्षिमित्रांसह गावकरीही आनंदले

खूशखबर ! विदेशी रुबाबदार ‘राजहंस’ अवतरले सावरगावच्या तलावात !
संजय अगडे
तळोधी (बा.) : नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील तलावावर विदेशी पक्ष्यांचे दर्शन होत असते. गेल्या सात ते आठ वर्षांपासून या तलावावर अनेक स्थलांतरित पक्षी येतात. ते विशेषतः परदेशातून प्रवास करत येतात. यातील एक रुबाबदार पक्षी म्हणजे राजहंस. रविवारी सकाळी तब्बल दहा राजहंस पक्ष्यांचे सावरगाव येथील तलावात दर्शन झाले. या पक्ष्यांना बघून पक्षिमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
राजहंस पक्षी हिमालयातून, तिबेट, कझाकिस्तान, रशिया आणि मंगोलियामार्गे उडतात. या राजहंसाचे थवे येथे येतात. हे पक्षी हिवाळ्याच्या सुरुवातीलाच ऑक्टोबरच्या महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात येतात. आणि मार्चच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीस परत जातात. रविवारी सकाळी सावरगाव तलावात दहा राजहंस पक्ष्यांचे दर्शन झाले. तसेच चक्रांग, तलवार बदक, थापाट्या, नदीसुराई, शेकाट्या, करकोचा इत्यादी अनेक पक्षी हे पक्षिमित्र व स्वाब संस्थाचे अध्यक्ष यश कायरकर हे पक्षी निरीक्षणाला गेले असता त्यांना निदर्शनास आले.
यश कायरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पाच-सात वर्षांपासून या तलावावर रंगीत करकोचा, हे एक-दोनच्या संख्येत यायचे. त्यानंतर त्यांच्यासोबतच राजहंसासारखे इतर विदेशी प्रवासी पक्षी येऊ लागले. मात्र आधी ते एक दोनच्या संख्येने यायचे. आता हळूहळू त्यांची संख्या वाढून १३-१४ एवढी झालेली आहे. मात्र मार्च संपत आला तरी हे पक्षी अजूनही परत गेलेले नाही, असे ते म्हणाले. आठवडाभरापूर्वी पक्षिमित्र रोशन धोत्रे पक्षी निरीक्षणाला गेले असता त्यांनाही १४ राजहंस दिसल्याचे त्यांनी सांगितले.
ही आहेत राजहंसाची वैशिष्ट्ये
एका दिवसात १६०० कि.मी. उडण्याची क्षमता असलेल्या या राजहंसाच्या कळपाने सावरगावच्या तलावात तळ ठोकला आहे. दोन ते तीन किलो वजनाच्या या राजहंसच्या डोक्यावर आणि मानेवर काळ्या खुणा असतात आणि त्यांचा रंग फिकट राखडी असतो. त्यांच्या डोक्यावर दोन काळ्या पट्ट्यांसह पांढरा रंग असतो, पाय मजबूत आणि केशरी रंगाचे असतात. त्यांची लांबी ६८ ते ७८ सेमी आणि पंखांची लांबी १४० ते १६० सेमी आहे. राजहंस पक्षी हिमालय पर्वतावरून म्हणजेच २८ हजार फूट उंचीवरून उडणारे पक्षी आहेत.