शेतकरी उत्पादकांची पहिली जिनिंग वरोऱ्यात; स्मार्ट प्रकल्पाने दिले बळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 13:50 IST2023-11-16T13:45:10+5:302023-11-16T13:50:09+5:30
१४ कोटींची गुंतवणूक : शेतकऱ्यांकडून थेट कापूस खरेदी करणार

शेतकरी उत्पादकांची पहिली जिनिंग वरोऱ्यात; स्मार्ट प्रकल्पाने दिले बळ
प्रविण खिरटकर
वरोरा (चंद्रपूर ) : विदर्भात कृषी प्रक्रिया उद्योगांची उणीव दूर करीत शेतकऱ्यांच्या कांचनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने राज्यातील पहिला जिनिंग प्रकल्प चिनोरा शिवारात उभारण्यात आला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या जिनिंग प्रकल्पाचे उद्घाटन झाले.
यावेळी आत्मा प्रकल्पाच्या संचालक प्रीती हिरळकर उपविभागीय कृषी अधिकारी सुशांत लवाटे, उपविभागीय दंडाधिकारी शिवनंदा लंगडापुरे, तहसीलदार योगेश कौटकर, नरेंद्र जीवतोडे तसेच कांचनी शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व संचालक, शेतकरी, वखार महामंडळाचे अधिकारी सुभाष पुजारी मेलने, प्रतीक मून, नितीन कळमकर, तेजस कळमकर आदी उपस्थित होते.
राज्यात ३८ ते ३९ लाख आणि एकट्या विदर्भात सुमारे १८ लाख हेक्टर कापसाची लागवड होते. परंतु प्रक्रिया उद्योगाचा अभाव असल्याने हंगामात अपेक्षित दर कापूस उत्पादकांना मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या वरोरा येथील कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनीने कापसावर प्रक्रिया करीत गाठी बांधण्याचा हायटेक प्रकल्प उभारला आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचे २ हजार २६ भागधारक आहेत. संचालकांमध्ये यशवंत सायरे, बळीराम डोंगरकार, नितीन टोंगे, सुधीर मत्ते, अनुप वासाडे, संजय ढवस, आशा सायरे, कृपाली पंचभाई आदींचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी बालाजी धोबे यांच्या नेतृत्वात कांचनीची टीम कार्यरत आहे.
चिनोरा शिवारात नऊ एकरात प्रकल्प
राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पातून २ कोटी ४० लाखांचे अनुदान प्रकल्पाला मिळाले. चिनोरा शिवारात हा प्रकल्प ९.६ एकरावर असून १४ कोटींचे बांधकाम करण्यात आले. याच परिसरात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाद्वारे गोदामाच बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. या गोदामात शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल सुरक्षित ठेवता येईल. शिवाय मागणीनुसार योग्य किंमत घेऊन विकता येईल. १४ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्णत्वास आला असून, येत्या हंगामापासून या ठिकाणी शेतकऱ्यांकडून थेट कापसाची खरेदी केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाने आर्थिक बळ पुरविले आहे.
कापसाला ७ हजार ३५१ रुपये प्रतिक्विंटल दर
कांचनी फार्मर कंपनीने चिनोरा येथे कापूस खरेदी सुरू केली. पहिल्याच दिवशी कापसाला ७ हजार ३५१ रुपये प्रतिक्विंटल दर देण्यात आला. खरेदीचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. विजय देवतळे, उपसभापती जयंत टेंभुर्डे यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालक बाळू भोयर, गणेश चवले, संगिता उरकांडे, वासुदेव उरकांडे, कंपनीचे अध्यक्ष यशवंत सायरे व संचालक उपस्थित होते. कापूस विक्रीस आलेले शेतकरी हिरामण देठे, धीरज कापटे, भानुदास बोधाणे, रमेश धोंगडे, ज्ञानेश्वर काकडे, चिंतामण श्रीरामे, बळीराम डोंगरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.