शेतकऱ्यांनो बियाणे खरेदी करताना घ्या ही खबरदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 15:43 IST2025-05-10T15:42:28+5:302025-05-10T15:43:24+5:30
Chandrapur : खरेदीचे अधिकृत पक्के बिल घ्या, जेणेकरून तक्रार असल्यास पुरावा मिळेल.

Farmers should take these precautions while purchasing seeds
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खरीप हंगामाला आता सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा हंगाम आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी परवानाधारक विक्रेत्याकडून बियाणे, खते खरेदी करावे. विक्री परवाना असलेल्या कृषी सेवा केंद्रातूनच कृषी निविष्ठा खरेदी करावी. गावोगावी फिरणाऱ्या एजंटकडून कोणतेही बियाणे घेऊ नये, असे आवाहन कृषी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी प्रती व पिकाच्या गरजेनुसार योग्य बियाण्याची जात निवडावी. स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. बियाण्यांच्या पॅकेटवर कंपनीचे नाव, लॉट नंबर, उत्पादन तारीख, अंतिम तारीख, वाणाचे नाव, उगवण क्षमतेची टक्केवारी व पाकिटावर छापलेले लेबल तपासावे. स्थानिक हवामान, बियाणे स्वच्छ, रोगमुक्त व एकसमान आकाराचे असावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
बियाण्याचे पाकीट व बिल जपून ठेवा
खरेदी केलेले बियाणे कोरड्या व थंड ठिकाणी साठवा. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच बियाणे निवडा. बियाण्याचे पाकीट व बिल जपून ठेवा. अधिकृत बिल व थोडेफार बियाणे हंगाम संपेपर्यंत राखून ठेवा. बियाण्याची पिशवी शिलाई केलेल्या बाजूने न फोडता खालील बाजूने फोडावी. टॅग व लेबल सांभाळून ठेवा. स्वस्त बियाण्यांच्या आमिषाला बळी न पडता अधिकृत कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करा. बियाणे संदर्भात तक्रारी असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी केले आहे.