खर्च मर्यादा ४० लाखांची; उमेदवारांचा प्रचारखर्च कळेना !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 13:09 IST2024-11-18T13:06:06+5:302024-11-18T13:09:44+5:30
विधानसभा निवडणूक : सगळीकडेच खर्च दिसतोय वारेमाप

Expenditure limit of 40 lakhs; Don't know the campaign expenses of the candidates!
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा जवळ आला आहे. असे असताना प्रचार खर्चाच्या पारदर्शकतेवर मात्र प्रश्न उपस्थित होत आहेत. ५ नोव्हेंबरपासून प्रचाराला सुरुवात झाली असून, सोमवारी सायंकाळी प्रचार थांबणार आहे. मात्र, आजपर्यंत उमेदवारांनी प्रचारावर किती खर्च केला, याचा ताळेबंद असला तरी वारेमाप खर्चावर खरंच नियंत्रण आहे का, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
निवडणूक आयोगाने प्रचार खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये निश्चित केली आहे. तरीही उमेदवार पाण्यासारखा पैसा खर्च करत असल्याचे सुज्ञ नागरिकांचे मत आहे. खर्चाचे दाखले आणि वास्तवातील फरक, प्रचारादरम्यान उमेदवार मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करत असल्याचे उघड दिसत आहे. मतदारसंघात उमेदवारांची शेकडो वाहने धावत असून त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होताना दिसत आहे. जिथे तिथे जेवणावळीवरही खर्च होत आहे. मात्र, अधिकृत कागदपत्रांमध्ये कमी खर्च दाखवला जातो का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निवडणूक खर्च तपासणीसाठी शासनाने निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या निरीक्षकांचा वॉच मतदारसंघावर आहे. तसेच उमेदवारांनी दिलेल्या खर्चाचे तपशीलही तपासले जात आहेत. असे असले तरी सामान्य माणसाला पडलेला प्रश्न बरेच काही सांगून जातो. त्यामुळे उमेदवारांनीच आपला खर्च करताना मर्यादा पाळणे गरजेचे आहे.