'चंद्रपूर पोलिस' साइटवरच चुका : फोटो एकाचा नाव दुसऱ्याचे ; अधिकाऱ्यांच्या पदातही चुकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:37 IST2025-06-12T17:35:29+5:302025-06-12T17:37:00+5:30
Chandrapur : आयपीएस अधिकाऱ्याचे पोर्टलवर केले डिमोशन

Errors on the 'Chandrapur Police' website: One person's name in the photo is another's; There is also a mistake in the officer's position
परिमल डोहणे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : 'सदैव तत्पर, आपल्यासोबत आपल्यासाठी' असे ब्रिद असलेल्या 'चंद्रपूरपोलिस' या साइटवर मोठ्या प्रमाणात चुकाच चुका दिसून येत आहेत. फोटो एका अधिकाऱ्यांचा, तर नाव दुसऱ्या अधिकाऱ्यांचे, एका मोठ्या अधिकाऱ्यांच्या पदात तर मोठी चूक करून त्यांचे डिमोशनच केले आहे. एवढेच नाही तर अनेक ठिकाणचे अधिकारी बदलले असून, जुनीच नावे व फोटो आहेत. त्यामुळे कोणत्या ठिकाणचा अधिकारी कोण आहे, कुणाला संपर्क करायचा, असा प्रश्न जनसामान्यांना पडत आहे.
आपत्कालिन स्थितीत सर्वसामान्यांना संबंधित ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क करता यावा, यासाठी जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने 'चंद्रपूर पोलिस' ही साइट तयार करण्यात आली आहे. या साइटवर जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, पोलिस विभागातील सर्व शाखा, सर्व ठाण्यातील ठाणेदार, सहायक पोलिस निरीक्षक यांची नावे व मोबाइल नंबरची नोंद असते. आपत्कालीन स्थितीत त्या साइटवर जाऊन संबंधित अधिकाऱ्यांचा नंबर शोधून त्यांच्याशी संपर्क करणे सोपे होते. मात्र, सद्यस्थितीत या साइटवर चुकाच चुका दिसून येत आहेत.
अशा आहेत चुका
मूलचे एसडीपीओ म्हणून सुधाकर यादव हे प्रभार सांभाळत आहेत. तरीही या साइटवर परिविक्षाधीन अधिकारी तथा तत्कालिन मूलचे एसडीपीओ प्रमोद चौगुले यांचे नाव आहे. मात्र, फोटो गडचांदूर येथील एसडीपीओ वींद्र जाधव यांचा आहे.
आयपीएस अधिकाऱ्याचे पोर्टलवर केले डिमोशन
वरोरा येथील एसडीपीओ (आयपीएस) नयोमी साटम यांच्या नावापुढे एपीआय लिहून त्यांचे तर डिमोशनच केले आहे. यासह इतरही अनेक चुका आहेत. त्यामुळे ही साइट उघडताच नेमका अधिकारी कुठला, संपर्क करायचा तर कुणाला, असा प्रश्न निर्माण होत आहे.
साइट अपडेट, मजकूर जुनाच
पूर्वीच्या तुलनेत चंद्रपूर पोलिस ही साइट मागील काही महिन्यांपूर्वी नव्या रुपात अपडेट करण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारचे फोटो, पोलिसांचे उपक्रम, प्रेस नोट यांसह विविध विभागांची माहिती टाकली आहे. मात्र, त्यातील पोलिस अधिकाऱ्यांची नावे अपडेट करण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अधिकारी बदलूनही त्यांचेच नाव आहे. मूल येथे सद्यस्थितीत एसडीपीओ सुधाकर यादव, तर मूलचे पीआय म्हणून एपीआय वंजारी हे प्रभार सांभाळत आहेत. तरीही पीआय म्हणून प्रमोद चौगुले यांचेच नाव आहे. राजुराचे ठाणेदार म्हणून सुमित परतेकी धुरा सांभाळत आहेत. परंतु, पोर्टलवर राजुराचे तत्कालिन ठाणेदार एएसपी अनिकेत हिरडे (आयपीएस) यांचेच नाव आहे.