काचबिंदूकडे दुर्लक्ष करू नका त्यामुळे कायमचे अंधत्वही येऊ शकते..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 15:45 IST2025-03-29T15:44:53+5:302025-03-29T15:45:14+5:30
Chandrapur : डोळ्यांची काळजी कशी घ्याल?

Don't ignore glaucoma, it can lead to permanent blindness.
चंद्रपूर : धूसर दिसणे, प्रकाशाभोवती इंद्रधनुष्यासारखे वलय दिसणे, डोके आणि डोळे दुखणे व उलटी होणे, हळूहळू दृष्टी कमजोर होणे, ही काचबिंदू होण्याची होण्याची लक्षणे आहेत. डोळ्यांच्या नेत्रगोलातील दाब वाढल्याने डोळ्याच्या ऑप्टिक नर्व्ह म्हणजे डोळ्यापासून मेंदूला जोडणाऱ्या मुख्य मज्जातंतूला हानी पोहोचते. त्यामुळे व्यक्तीची दृष्टी हळूहळू अधू होऊ लागते. डोळ्यांच्या अशा परिस्थितीला 'काचबिंदू' म्हणतात. जर काचबिंदूचे वेळेत निदान झाले नाही तर कायमचे अंधत्वदेखील येऊ शकते, असे नेत्रतज्ज्ञांचे मत आहे.
अनेकांवर शस्त्रक्रिया
मागील काही महिन्यांमध्ये खासगी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेकांना काचबिंदू आढळून आला आहे. रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्यांची समस्या सुटली आहे.
डोळ्यांची काळजी कशी घ्याल?
- डोळ्यांची काळजी घेण्यासाठी पुरेशी झोप घ्या आणि डोळ्यांना हानिकारक गोष्टींपासून दूर ठेवा.
- स्पष्ट उजेडातच वाचन करा, अतिलख्ख लाईटच्या प्रकाशापासून दूर राहा, तसेच आहारात फळे, भाज्याचे सेवन करा. गडद हिरव्या पालेभाज्या आहारात समाविष्ट करा.
- डोळ्यांसाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन आणि अँटिऑक्सिडंट्स पुरवतात. ते अधिकाधिक खाण्याचा प्रयत्न करा.
डोळ्यांची तपासणी कधी करायला हवी?
डोळे हा शरीराचा महत्त्वपूर्ण अवयव आहे. त्यामुळे त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. डोळ्यांची नियमित तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे, खास करून ४० वर्षांनंतर, साधारणपणे, दर २ वर्षांनी एकदा डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे; पण काही विशेष परिस्थितीत, जसे की मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकासाठी वर्षातून एकदा तपासणी करणे आवश्यक आहे.
"प्रत्येकांनी डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. धूसर दिसणे, प्रकाशाभोवती इंद्रधनुष्यासारखे वलय दिसणे, डोकं आणि डोळे दुखणे व उलटी होणे, हळूहळू दृष्टी कमजोर होणे, ही काचबिंदू होण्याची लक्षणे आहेत. अशी लक्षणे असेल तर त्वरित तपासणी करून घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही ड्रॉप डोळ्यांत टाकू नये."
- डॉ. भूषण उपचंचिवार, नेत्ररोग तज्ज्ञ, चंद्रपूर