यू-डायस प्रमोशनसाठी दिलेली मुदत संपली, २८ मुख्याध्यापकांवर कारवाई निश्चित?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:43 IST2025-06-20T17:42:43+5:302025-06-20T17:43:53+5:30
Chandrapur : २८ शाळांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात!

Deadline for U-Dice promotion has expired, action against 28 principals certain?
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : यू-डायस प्लस प्रणालीत वर्गोन्नोती (प्रमोशन) करण्यात तालुक्यातील २८ शाळांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वास्तवदर्शी खुलासा केला नाही तर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही संबंधित अधिकाऱ्यांनी दिला आहे.
जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या पत्रानुसार, यू-डायस २०२५-२६ प्रणालीमध्ये विद्यार्थी वर्गोन्नोती सुरू करण्यात आली. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची नोंदणी करणे या प्रणालीत बंधनकारक आहे. २०२५-२६ मधील ऑनलाइन यू-डायस प्रणालीमध्ये नोंद असलेल्या विद्यार्थ्यांचे नियमानुसार पुढील वर्गात वर्ग नक्की करणे आवश्यक आहे. मुख्याध्यापकांनी विद्यार्थी वर्गोन्नतीचे काम १६ जून २०२५ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. मात्र, २८ शाळांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवली. कार्यवाहीचा अहवाल सादर करताना संबंधित मुख्याध्यापकांना २० जून २०२५ नंतर ही कामे करता येणार नाहीत, असेही कळविले होते.
वर्गोन्नोतीकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळा
आकाश प्राथमिक शाळा गोंडपिपरी, आक्सापूर हायस्कूल आक्सापूर, अनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळा कुडेसावली, भारतीय माध्यमिक आश्रम शाळा तोहोगाव, इंदिरा गांधी हायस्कूल चेक दरूर, किसन विद्यालय वेळगाव, नवजीवन विद्यालय गोजोली, नवज्योती कॉन्व्हेंट आक्सापूर, दुर्गावती निवासी मूकबधिर विद्यालय गोंडपिपरी, श्रीराम आदिवासी प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा गोजोली, सुभद्राबाई सांगडा पाटील आश्रम शाळा गोंडपिपरी, स्वामी विवेकानंद आश्रम शाळा किरमिरी, जि.प. हायस्कूल बोरगाव, जि.प. हायस्कूल चेक नांदगाव, जि.प. हायस्कूल चेक सोमनपल्ली तसेच चेक गोजोली, चेक पेल्लूर, चिवांडा, धाबा, जोगापूर, किरमेरी, सोमनपल्ली, सुखवासी, वटराणा, विहीरगाव, चेक दरूर, गोजोली मक्ता येथील जिल्हा परिषद शाळा अशा एकूण २८ शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.