चंद्रपूर जिल्ह्यातील १२ गावांचा संपर्क तुटला; नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:47 IST2025-07-09T15:46:52+5:302025-07-09T15:47:56+5:30

Chandrapur : गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व ३३ गेट उघडल्याने वैनगंगा नदीला पूर

Communication lost with 12 villages in Chandrapur district; Alert issued to villages along the river | चंद्रपूर जिल्ह्यातील १२ गावांचा संपर्क तुटला; नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा

Communication lost with 12 villages in Chandrapur district; Alert issued to villages along the river

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
जिल्ह्यात दोन दिवस झड सुरू असतानाच मंगळवारी (दि. ८) मुसळधार बरसल्याने शिवार जलमय झाले. नाल्यांना पूर आला. ब्रह्मपुरी तालुक्यात रपटे वाहून गेल्याने व पुलावरील पाण्याने १२ गावांचा सायंकाळपर्यंत संपर्क तुटला होता. गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व ३३ गेट उघडल्याने वैनगंगा नदीला पूर आला. नालेही दुथडी भरून वाहत आहेत. खुल्या खाणीतील कोळसा उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला. नदीकाठावरील गावांनी सतर्क राहावे, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.


जिवती, कोरपना, राजुरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, भद्रावती, वरोरा व पोंभुर्णा तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. मूल, सावली, सिंदेवाही तालुक्यांत दमदार पावसाची गरज आहे.


ब्रह्मपुरीत जोरदार बरसला
तालुक्यात संतत पाऊस पडल्याने रपटा वाहून गेला. ब्रह्मपुरी-वडसा मार्ग सध्या बंद झाला आहे. अन्हेर मार्गावर व बोरगावकडे जाणाऱ्या लहान पुलावरून पाणी वाहत आहे. पूर आल्याने व रपटे वाहून गेल्याने बोरगाव, झिलबोडी, परसोडी, नवेगाव, चिखलगाव, अन्हेर, पिंपळगाव, भालेश्वर, नांदगाव आदी गावांचा तालुक्याशी संपर्क संपर्क तुटला आहे. पारडगाव नदी पुलावरून पाणी वाहत असल्याने पारडगाव, बेटाळा व बोढेगाव या गावांचा संपर्क सायंकाळी ५ वाजेपर्यंत तुटला आहे.


पळसगाव खुर्द येथे महिलेचे घर कोसळले
तळोधी (बा.): संततधार पावसामुळे नागभीड तालुक्यातील पळसगाव (खुर्द) येथील चंद्रकला सोनटक्के यांचे घर कोसळले. २० वर्षांपूर्वी घरकुल योजनेतून बांधलेले हे घर बांधले होते. सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, महिलेचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेची माहिती पोलिस पाटील प्रवीण रामटेके यांनी प्रशासनाला दिली. पंचनामा करण्यात आला. गावातील रूपचंद खोब्रागडे यांच्या घरी सध्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Communication lost with 12 villages in Chandrapur district; Alert issued to villages along the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.