पेट्रोल चोरांच्या दहशतीत चंद्रपुरातील नागरिक; एकाच रात्रीत आठ ते दहा कारवर हात साफ
By साईनाथ कुचनकार | Updated: September 13, 2023 16:22 IST2023-09-13T16:20:25+5:302023-09-13T16:22:34+5:30
कारमधून होत आहे पेट्रोल चोरी

पेट्रोल चोरांच्या दहशतीत चंद्रपुरातील नागरिक; एकाच रात्रीत आठ ते दहा कारवर हात साफ
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरात चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लहान, मोठ्या चोरींसह, दुचाकी आणि आता चक्क कारमधील पेट्रोल चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. विशेष म्हणजे, तुकूम तसेच तुळशी नगरात दिवसाआड कारमधून पेट्रोल चोरीला जात आहे. एकाच दिवशी आठ ते दहा कारमधून पेट्रोल चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये पेट्रोल चोरांची प्रचंड दहशत पसरली आहे.
पोलिसांनी अशा घटनांकडे लक्ष देऊन रात्रीची गस्त वाढविणे गरजेचे आहे. लहान, मोठ्या चोरीच्या घटनेनंतर आता चोरट्यांचे लक्ष कारमधील पेट्रोल चोरीकडे गेले आहे. तुकूम परिसरातून मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात कारमधून पेट्रोल चोरीला जात आहे. यासंदर्भात नागरिकांनी पोलिसांनाही माहिती दिली आहे. मात्र, पेट्रोल चोरीच्या घटना बंद होण्याऐवजी आणखीच वाढत आहेत. तुकूमनंतर चोरट्यांनी तुळशी नगरातील कारवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. घराबाहेर ठेवून असलेल्या कारमधून रात्रीच्या वेळी चोरटे पेट्रोल पाइप कापून पेट्रोल चोरी करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये पेट्रोल चोरट्यांची दहशत पसरली आहे.
पोलिसांचाही नाही धाक
शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. दरम्यान आता कारमधून पेट्रोल चोरी होत आहे. चोरट्यांना पोलिसांचा धाक नसल्याची स्थिती आहे. तुकूम त्यानंतर आता तुळशी नगरात कारमधून पेट्रोल चोरी जात असल्याने चोरट्यांना पोलिसांचा धाक नसल्याचे चित्र सध्या शहरात बघायला मिळत आहे.
दोन हजारांवर कार धारकांना येतोय खर्च
चोरटे पेट्रोल पाइप कापून पेट्रोल चोरी करीत आहेत. जेव्हा पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर कारधारक जातात तेव्हा त्यांच्या लक्षात हा प्रकार येत आहे. त्यानंतर पाइप बदलण्यासाठी दोन ते अडीच हजार रुपयांचा खर्च येत आहे. त्यातच पेट्रोल चोरीचा वेगळा खर्च त्यामुळे नागरिकांना मानसिक त्रास होत आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांमध्ये शहरातील विविध कार सर्व्हिसिंग सेंटरमध्ये दररोज कारचे पेट्रोल पाइप बदलण्यासाठी अनेकजण जात आहेत.