चंद्रपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विजय संकल्प’ यात्रेतून फुंकले रणशिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 14:15 IST2026-01-04T14:14:29+5:302026-01-04T14:15:04+5:30
माता महाकाली दर्शन घेऊन रोड शोने मनपा निवडणुकीच्या प्रचाराला फोडला नारळ

चंद्रपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विजय संकल्प’ यात्रेतून फुंकले रणशिंग
चंद्रपूर : येत्या महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरच्या राजकीय मैदानात रविवारी खऱ्या अर्थाने रणधुमाळी सुरू झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरच्या आराध्य दैवत माता महाकालीचे दर्शन घेत चंद्रपूरात भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडून विजय संकल्प यात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास अंचलेश्वर गेट ते गिरणार चौक, गांधी चौक मार्गे जटपुरा गेटपर्यंत काढण्यात आलेल्या या भव्य रोड शोमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निघालेल्या विजय संकल्प यात्रेत पालकमंत्री डाॅ. अशोक उईके, राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार बंटी भांगडिया, करण देवतळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या यात्रेने भाजपच्या एकजुटीचेही ठोस दर्शन घडवले.
रोड शोदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. मुख्यमंत्री वाहनातून उभे राहून नागरिकांचे अभिवादन स्वीकारत होते. हात हलवत, नम्रपणे अभिवादन करत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. फुलांची उधळण, घोषणाबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात वातावरण भारावून गेले होते.
या विजय संकल्प यात्रेतून भाजपने निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरून काढलेल्या रोड शोमुळे पक्षाची संघटनात्मक ताकद, नेत्यांची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांचा उत्साह ठळकपणे दिसून आला. विशेष म्हणजे, काही काळापासून वेगवेगळ्या राजकीय समीकरणांमुळे चर्चेत असलेल्या स्थानिक नेतृत्वाने एकाच व्यासपीठावर येत एकजुटीचे संकेत दिले.
महानगर पालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढाई नसून, राज्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम करणारी मानली जाते. त्यामुळे चंद्रपूरातील या शक्तिप्रदर्शनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. फडणवीसांच्या रोड शोने भाजपने प्रचाराची आघाडी घेतली आहे. आगामी काळात प्रचार आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. चंद्रपूरच्या राजकारणात रविवारी झालेल्या या शक्तिप्रदर्शनाने निवडणुकीची धग अधिकच वाढवली आहे.