चंद्रपूर: EVMचे बटण दाबूनही लाईट लागेना, तांत्रिक कारणामुळे काही केंद्रांवर प्रक्रिया थांबली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:16 IST2025-12-02T12:11:50+5:302025-12-02T12:16:24+5:30
सकाळी ९.३० पर्यंत ५.५२% सरासरी मतदान

चंद्रपूर: EVMचे बटण दाबूनही लाईट लागेना, तांत्रिक कारणामुळे काही केंद्रांवर प्रक्रिया थांबली
चंद्रपूर: जिल्ह्यातील ९ नगर परिषद आणि भिसी नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे प्रक्रिया काही काळासाठी थांबली. चंद्रपूरच्या गडचांदूर प्रभाग क्रमांक ९ मधील बूथ क्रमांक १ येथे मशीनवरील बटण दाबल्यानंतर लाईट न लागल्याने मतदान काही वेळ बंद राहिले. तांत्रिक सल्लागारांच्या हस्तक्षेपानंतर समस्या तत्काळ दूर करण्यात आली. मूल शहरातील बूथ क्रमांक १ आणि २ येथेही ईव्हीएममध्ये बिघाड आढळून आला. बूथ क्रमांक १ वर जवळपास अर्धा तास आणि बूथ क्रमांक २ वर सुमारे ३० मिनिटे मतदान प्रक्रिया बंद होती. नव्या मशीन उपलब्ध करून देत मतदान पुन्हा सुरु करण्यात आले.
वरोरा नगरपरिषद निवडणुकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रभाग पाचमधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. चिमूर शहरात नगरपरिषद निवडणूक शांततेत सुरु असून भाजपा उमेदवार गीता लिंगायत, दुर्गा सातपुते आणि निता लांडगे यांनी आपल्या-आपल्या प्रभागातील मतदान केंद्रांवर जाऊन मतदान केले.
पहिल्या टप्प्यात सकाळी ९.३० वाजेपर्यंतचे सरासरी मतदान:
- भद्रावती – 4.88%
- वरोरा – 5.01%
- चिमूर – 5.34%
- भिसी – 9.55%
- ब्रह्मपुरी – 5.90%
- नागभीड – 7.40%
- मूल – 7.28%
- बल्लारपूर – 5.66%
- राजुरा – 4.73%
- गडचांदूर – 3.53%
एकूण सरासरी मतदान : 5.52%