Chandrapur Election Results 2026 : चंद्रपुरात काँग्रेसने रोखली भाजपची हॅट्रिक ! नगर परिषद निकालांचे पडसाद मनपाच्या निकालावर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 13:37 IST2026-01-17T13:34:53+5:302026-01-17T13:37:15+5:30
Chandrapur : महापालिका स्थापनेच्या पहिल्याच टर्ममध्ये सत्तारूढ झाल्यानंतर काँग्रेसला दीर्घकाळासाठी अनुकूल स्थिती होती. मात्र, पक्षातीलच काही नगरसेवकांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर सत्तेची समीकरणे बदलली. पुढे

Chandrapur Election Results 2026 : Congress stops BJP's hat-trick in Chandrapur! Impact of Nagar Parishad results on Municipal Corporation results?
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महापालिका स्थापनेच्या पहिल्याच टर्ममध्ये सत्तारूढ झाल्यानंतर काँग्रेसला दीर्घकाळासाठी अनुकूल स्थिती होती. मात्र, पक्षातीलच काही नगरसेवकांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर सत्तेची समीकरणे बदलली. पुढे भाजपच्या झंझावातासमोर काँग्रेस पिछाडीवर गेली. अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भाजपशी घरोबा केला. या निवडणुकीत ६६ पैकी तब्बल २७ जागांवर वर्चस्व मिळवत काँग्रेसने महापालिकेत दमदार 'एन्ट्री' केली आहे.
महापालिकेच्या २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने एकहाती ३६ जागांवर विजय मिळवून सत्ता काबीज केली होती. त्यावेळी पक्षात बंडखोरी नसतानाही काँग्रेसला १२ जागांच्या पुढे जाता आले नाही. भाजपने सलग दोन टर्म एकहाती सत्ता राबवून काँग्रेसला बॅकफूटवर नेले. या कालावधीत भाजपला केंद्र व राज्य सरकारच्या सत्तेचे भक्कम पाठबळ होते. भाजपची सत्ता असलेल्या पालिकेचा पंचवार्षिक कालावधी २०२२ मध्ये संपला. तेव्हापासून पालिकेवर प्रशासकराज सरू आहे. भाजपकडे डबल इंजिन सरकार असल्याने काँग्रेस या निवडणुकीला कशी सामोरे जाते, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तिकीट वाटपात काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर मात केली. आपल्या समर्थकांना उमेदवारी देऊन वडेट्टीवार समर्थकांना दूर सारले, तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील गटबाजी उफाळून आली. परिणामी, उमेदवारी नाकारलेल्या २० उमेदवारांनी भाजपविरोधात बंडखोरी करून रिंगणात उतरले होते. भाजपच्या उघड गटबाजीने अनेक प्रभागांत काँग्रेससाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले.
भाजप ३६ वरून १८ वर घसरली २०१७ मध्ये १२ जागा जिंकलेल्या काँग्रेसने थेट २७जागांवर वर्चस्व मिळविले. तिकीट नाकारलेले वडेट्टीवार समर्थक नंदू नागरकर व प्रशांत दानव यांनीही अपक्ष निवडणूक लढवून विजयी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडला होता. मात्र, २०१७ चे यश भाजपला राखता आले नाही. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेसने मनपातही विजय मिळविल्याने भाजपत खळबळ उडाली. भाजपतील अंतर्गत गटबाजी व पालिकेतील पिछाडीचे पडसाद जि. प. व प.स. निवडणुकीवर उमटण्याची चर्चा सुरू झाली आहे.