चंद्रपूर मनपा संकेतस्थळावर अपलोडच झाले नाही उमेदवारांचे शपथपत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 19:56 IST2026-01-06T19:55:44+5:302026-01-06T19:56:12+5:30
गतिमान प्रशासनावर प्रश्नचिन्ह : परिशिष्ट एकमध्ये नाही उमेदवारांच्या मालमत्तेची नोंद

Candidates' affidavits not uploaded on Chandrapur Municipal Corporation website
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सर्वोच्च न्यायालयाने २ मे २००२ रोजी निर्णयानुसार, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची माहिती मतदारांना उपलब्ध होणे, हा मतदारांचा मूलभूत हक्क असल्याचे स्पष्ट केले. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व गतिमान करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा आदेश आहे. मात्र, चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक प्रशासनाकडून रिंगणातील संपूर्ण ४५१ उमेदवारांची शपथपत्र सोमवारी (दि. ५) रात्री १० वाजेपर्यंत अपलोड झालेली नाहीत. काही अपलोड झालेल्या शपथपत्रातील परिशिष्ट- १मध्ये उमेदवारांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची नोंद नाही. त्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिवाणी अपील क्रमांक ७१७८/२००१, दि. २ मे २००२मध्ये दिलेल्या निर्णयानुसार, निवडणूक लढविणाऱ्या सर्व मेदवारांकडून त्यांच्या शैक्षणिक पात्रता, मालमत्ता व देणी तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी याबाबतचे शपथपत्र घेणे बंधनकारक आहे.
शपथपत्राचा नमुना निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुधारित केला आहे. त्यानुसार प्राप्त परिशिष्ट- १मधील शपथपत्रातील माहिती प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. मतदारांना उमेदवारांविषयी संपूर्ण व सत्य माहिती उपलब्ध झाल्यास ते सूज्ञ, स्वतंत्र व जबाबदार निर्णय घेऊ शकतात. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी उमेदवारांकडून शपथपत्राद्वारे माहिती घेऊन सार्वजनिक करणे आवश्यक आहे. मनपा प्रशासनाने न्यायालय निर्णयाच्या अधीन राहून परिशिष्ट-१ मधील काही शपथपत्रांतील माहिती संकेतस्थळावर अपलोड केली. मात्र, या शपथपत्रांत मालमत्ता, देणी, व्यवसाय, उत्पन्न या महत्त्वपूर्ण बाबींची नोंद केलेली नाही.
परिशिष्ट-१ मध्ये कोणती माहिती आहे?
संकेतस्थळावर काही अपलोड शपथपत्रांमधील परिशिष्ट-१मध्ये वैयक्तिक माहिती, प्रभाग क्रमांक व अनुक्रमांक, शिक्षण, शैक्षणिक अर्हता, अपत्ये, गुन्हेगारी, न्यायालयीन प्रकरणे, राजकीय पक्षांच्या उमेदवारीसाठी नावे कळविण्याचे लेखी सूचनापत्र, मतपत्रिकेत नाव छापण्याबाबत नमुना १५ अशी माहिती आहे. मात्र, उमेदवारांची स्थावर व जंगम मालमत्ता तसेच कर्जाची माहिती, या परिशिष्ट-१मध्ये नाही.
अंतिम मतदारांची वॉर्डनिहाय यादी अपलोड
राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर झाल्यापासून चंद्रपूर महानगर पालिकेने आजवर सर्व माहिती संकेतस्थळावर अपलोड केली आहे. निवडणूक चिन्हांचे घोषणापत्र, नामांकनपत्रांची माहिती, प्रभागरचना, संभाव्य दुबार नावे व अंतिम मतदारांची वॉर्डनिहाय यादीही तेथे उपलब्ध आहे. यासाठी संबंधित यंत्रणेने रात्रंदिवस काम केल्याचे सांगितले जाते. मात्र, शपथपत्रांबाबत विलंब झाल्याने नागरिक विचारणा करू लागले आहेत.
"निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची शपथपत्र महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम सुरू होईल. ही पूर्णतः तांत्रिक प्रक्रिया आहे. अपलोड झालेले शपथपत्र २ मे २००२च्या न्यायालयीन निर्णयानुसार आहेत."
- अकुनुरी नरेश, आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनपा, चंद्रपूर