चंद्रपुरात भाजपचा गोंधळ, दिला चुकीचा एबी फॉर्म ! उमेदवारावर अपक्ष लढण्याची परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:14 IST2026-01-08T13:12:34+5:302026-01-08T13:14:10+5:30
Chandrapur : मनपा निवडणुकीसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी एकाच प्रभागांत दोन-तीन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने मोठा वाद उफाळून आला होता.

BJP's confusion in Chandrapur, wrong AB form given! Situation of independent contesting on candidate
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मनपा निवडणुकीसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी एकाच प्रभागांत दोन-तीन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने मोठा वाद उफाळून आला होता. या गोंधळात एकोरी मंदिर १० ब. (नामाप्र महिला) प्रभागातील भाजपच्या उमेदवार सरिता विकास घटे यांना चुकीचा एबी फॉर्म दिल्याने निवडणूक प्रशासनाने तो बाद केला. त्या आता अपक्ष उमेदवार म्हणून 'एअर कंडिशनर' चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने भाजपवर नामुष्की ओढवली आहे.
भाजपकडून उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुकांनी स्थानिक नेत्यांकडे रांगा लावल्या होत्या. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप उमेदवारांची यादी अंतिम करून निवडणूक निरीक्षक आणि स्थानिक नेत्यांकडे एबी फॉर्म दिला होता. दरम्यान, प्रदेशाध्यक्षांच्या यादीतील नावे बदलविण्याने भाजप शहर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टवार यांना पद गमवावे लागले. एकोरी मंदिर १० ब प्रभागातील (नामाप्र महिला) राखीव जागेसाठी भाजपकडून सरिता विकास घटे यांनी नामांकन दाखल केला होता, परंतु राजकीय गोंधळात त्यांना एकोरी ब गटाऐवजी दुसऱ्या गटाचा एबी फॉर्म देण्यात आला.
छाननी प्रक्रियेत घटे यांचा एबी फॉर्म रद्द झाला. त्यामुळे घटे यांना भाजपच्या कमळ चिन्हाऐवजी अपक्ष म्हणून एअर कंडिशनर या चिन्हावर निवडणूक लढवावी लागत आहेत. या प्रभागात १० ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) च्या विणा खनके, उद्धवसेनेच्या छाया बरडे, काँग्रेसच्या संजीवनी वासेकर आदींसह एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत.
रवी जोगी अपक्ष उमेदवार
भाजपचे कट्टर समर्थक असलेले प्रा. रवी जोगी यांनी वडगाव प्रभागातून उमेदवारी मागितली होती. त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. एबी फार्मसुद्धा देण्यात आला. मात्र अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच उमेदवाराला भाजपचा एबी फार्म मिळाल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला. त्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवित आहे. त्याचा फटका येथील भाजप उमेदवारांना बसणार असल्याचे बोलल्या जात आहे.