मार्कंडा यात्रेतून परतणाऱ्या ऑटोला म्हैस आदळली; ऑटो उलटल्याने चार जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 14:33 IST2023-02-20T14:30:27+5:302023-02-20T14:33:16+5:30

देवाडा खुर्द गावाजवळील घटना

Auto returning from Markanda yatra hit by buffalo; Four people injured as the auto overturned | मार्कंडा यात्रेतून परतणाऱ्या ऑटोला म्हैस आदळली; ऑटो उलटल्याने चार जण जखमी

मार्कंडा यात्रेतून परतणाऱ्या ऑटोला म्हैस आदळली; ऑटो उलटल्याने चार जण जखमी

पोंभूर्णा (चंद्रपूर) : मार्कंडा येथील महाशिवरात्री यात्रेवरून भाविक ऑटोरिक्षाने परत येताना पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द गावाजवळ ऑटोला म्हैस आदळल्याने ऑटो पलटून चार जण गंभीर जखमी झाले. यात दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

विदर्भाची काशी असलेल्या मार्कंडा येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. येथे दर्शनासाठी हजारो भाविक येतात. बल्लारपूर येथून काही भाविक मार्कंड्याला यात्रेसाठी गेले होते. दर्शन करून परत येत असताना पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द गावाजवळ त्यांच्या ऑटोला (एमएच-३४-बिएच-१२०३) म्हैस आदळली. यामुळे ऑटो पलटून चार जण जखमी झाले. यात मामाकडे आलेली दीपाली गजानन येसने रा. पळसमंडळ, जि. अमरावती हिला गंभीर मार लागला असून तिचा हात व पाय फॅक्चर झाला आहे.

जखमींमध्ये मृण्मयी सुरजोगे (९) रा.बल्लारपूर, तक्ष रवी सुरजोगे (११) रा. बल्लारपूर व रवी सुरजोगे (३९) रा. बल्लारपूर अशी जखमींची नावे आहेत. चौघांनाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूरला रेफर करण्यात आले. घटनेचा पुढील तपास पोंभूर्णा पोलिस करीत आहेत.

Web Title: Auto returning from Markanda yatra hit by buffalo; Four people injured as the auto overturned