आईसोबत जाणाऱ्या युवतीच्या डोक्यावर मारला हातोडा; भररस्त्यात हत्या करण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 14:42 IST2023-03-10T14:41:40+5:302023-03-10T14:42:14+5:30
नागरिकांनीच केले पोलिसांच्या स्वाधीन

आईसोबत जाणाऱ्या युवतीच्या डोक्यावर मारला हातोडा; भररस्त्यात हत्या करण्याचा प्रयत्न
ब्रम्हपुरी (चंद्रपूर) : येथील लक्ष्मीनारायण मंदिराजवळून एक युवती आपल्या आईसोबत जात असताना एका तरुणाने मागून येत भररस्त्यातच तिच्या डोक्यावर हातोड्याने वार केला. तिची हत्या करण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, लगेच नागरिकांनी धाव घेत त्या तरुणाला पकडले. नंतर पोलिसांना बोलावून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.
लवेश वामन देऊळकर (२४, रा. नान्होरी) असे आरोपीचे नाव आहे. बुधवारी दुपारच्या दरम्यान यातील पीडित युवती आपल्या आईसह ब्रम्हपुरीहून बोंडेगावकडे जात असताना कॉलेजसमोरील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ लवेश वामन देऊळकर याने तिथे येऊन आपल्याजवळील हातोड्याने युवतीच्या डोक्यावर वार करून जखमी केले. जवळपास उभे असलेल्या लोकांनी प्रसंगावधान दाखवत लवेशला पकडले व पोलिसांना याबाबत माहिती दिली. ब्रम्हपुरी पोलिस ठाण्याचे पोहवा. सचिन बारसागडे हे त्याच भागात असल्याने त्यांनी लगेच घटनास्थळी जाऊन आरोपीस ताब्यात घेतले.
लग्नासाठी पीडितेला वारंवार त्रास द्यायचा आरोपी
आरोपी हा पीडित युवतीच्या आईचा मानलेला भाऊ आहे. तो पीडितेला वेगवेगळ्या नंबरवरून वारंवार फोन करून त्रास देऊन लग्नाची मागणी घालत होता. परंतु, तिची आई त्याला भाऊ मानत असल्याने तिने नकार देऊन फोन न करण्याबाबत वारंवार बजावले होते. या रागातून त्याने तिच्यावर हा जीवघेणा हल्ला केला होता. पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द कलम ३०७, ३५४ (ड) भा. दं. वि. सहकलम ३ (२) (व्ही) अ. जा. अ. ज. अ. प्र. का. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे करीत आहेत.