चंद्रपुरात २० हजार ३९६ नागरिकांनी घेतले योगाचे धडे
By साईनाथ कुचनकार | Updated: May 25, 2023 16:42 IST2023-05-25T16:42:04+5:302023-05-25T16:42:51+5:30
आरोग्य जपण्यासाठी महापालिका आणि पतंजली योग समितीचा उपक्रम

चंद्रपुरात २० हजार ३९६ नागरिकांनी घेतले योगाचे धडे
चंद्रपूर :चंद्रपूर महानगरपालिका व पतंजली योग समितीद्वारे आयोजित योग प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले होेते. यामध्ये सात दिवसांमध्ये तब्बल २० हजार ३९६ नागरिकांनी सहभाग घेत योग शिक्षणाचे धडे घेतले. दरम्यान, नि:शुल्क सेवा देणाऱ्या योग शिक्षकांचा महापालिकेच्या वतीने आयुक्त विपीन पालिवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रोगमुक्त चंद्रपूर अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. स्वस्थ्य आरोग्य ठेवण्यासाठी सकारात्मक विचार, व्यसनमुक्ती, रोग प्रतिकारात्मक शक्ती वाढविण्यासाठी ७० योग प्राणायाम शिबिरे चंद्रपूर शहरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या ७ दिवसीय निःशुल्क शिबिरांतर्गत १९८७ योगसत्र घेण्यात आले. यामध्ये एकूण २० हजार ३९६ नागरिकांनी सहभाग घेतला.
या योग शिबिरांत निःशुल्क सेवा देऊन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या योगकर्मींना मनपाद्वारे भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वाधिक योगसत्रे घेणाऱ्या योग शिक्षक सुधाकर शिरपूरवार व सपनकुमार दास, महिला योग शिक्षिका नसरीन शेख, स्मिता रेभनकर यांचा तसेच पालिका वैद्यकीय अधिकारी म्हणून सर्वाधिक योगसत्रे आयोजित करणाऱ्या डॉ. नयना उत्तरवार, डॉ. अश्विनी भारत यांचाही सत्कार करण्यात आला.