Penny Stock: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, मात्र काही छोटे शेअर्स गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात. अशाच शेअर्समध्ये Indiabulls Limited च्या शेअरचाही समावेश आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा फायदा करून दिला आहे. गुरुवारी तब्बल १० टक्क्यांचा अपर सर्किट लागून हा शेअर ₹१९.७० वर पोहोचला. विशेष म्हणजे, केवळ एका महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट केला आहे.
शेअर बाजारात गुरुवारी मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव होता. BSE Sensex १,२०० अंकांहून अधिक घसरून ७६,२५९ च्या पातळीवर आला, तर Nifty 50 मध्येही सुमारे ३५० अंकांची घसरण झाली. मात्र, या नकारात्मक वातावरणात Indiabulls चा शेअर चमकला.
फेब्रुवारी २०२६ मध्ये हा शेअर ₹८.९३ या ५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर होता. त्यानंतर आतापर्यंत त्यात १२० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सध्याचा भाव हा ५२ आठवड्यांच्या उच्चांक ₹२०.९१ (ऑक्टोबर २०२५) पासून केवळ ६ टक्के दूर आहे. विशेष म्हणजे, गेल्या एका महिन्यात या शेअरने ११५ टक्के, तीन महिन्यांत ८५ टक्के, तर वर्षभरात ४२ टक्के परतावा दिला आहे.
या तेजीत मुख्य भूमिका कंपनीच्या दमदार तिमाही निकालांची आहे. मार्च तिमाहीत कंपनीच्या नफ्यात ४६.४ टक्क्यांची वाढ झाली असून, करानंतरचा नफा (PAT) ₹१९४ कोटींवर पोहोचला आहे. या कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न ₹४१८ कोटी होते. संपूर्ण वित्त वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीने ₹८८० कोटींच्या उत्पन्नावर ₹३४६ कोटींचा निव्वळ नफा कमावला असून, नफा मार्जिन ३९.३ टक्के राहिला आहे.
कंपनीच्या वाढीमागे रिअल इस्टेट व्यवसायाचा मोठा वाटा आहे. चौथ्या तिमाहीत या सेगमेंटमधून ₹१४३ कोटींचे योगदान मिळाले. वर्षभरात कंपनीने ₹२,७५२ कोटींच्या सेल्स बुकिंगसह २१.६ लाख चौरस फूट क्षेत्रातील ९०९ युनिट्स विक्री केली. तसेच ₹४०० कोटींची वसुली झाली. दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि लुधियाना या प्रमुख बाजारांमध्ये ₹२ कोटी ते ₹६ कोटी किंमतीच्या घरांवर कंपनीचा फोकस आहे. याशिवाय, कंपनीकडे ₹२१,००० कोटींपेक्षा जास्त ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू (GDV) असलेले प्रोजेक्ट्स पाइपलाइनमध्ये आहेत.
रिअल इस्टेटसोबतच कंपनीचा वित्तीय सेवा व्यवसायही मजबूत झाला आहे. स्टॉक ब्रोकिंग सेगमेंटमधून वित्त वर्ष २६ मध्ये ₹१२४.४ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. ग्राहकसंख्या वाढत असून, एकूण एसेट्स ₹६८,००० कोटींच्या पुढे गेले आहेत. एसेट रिकन्स्ट्रक्शन व्यवसायातही कंपनीने ₹२८८ कोटींची वसुली केली आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
