Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोकरकपातीची लाट! कंपन्यांनी यावर्षी अनेक कर्मचाऱ्यांना बसविले घरी, मंदीच्या धास्तीने सावध पाऊल

नोकरकपातीची लाट! कंपन्यांनी यावर्षी अनेक कर्मचाऱ्यांना बसविले घरी, मंदीच्या धास्तीने सावध पाऊल

जगभरातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून कर्मचारी कपात सुरू झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 07:24 AM2022-11-08T07:24:43+5:302022-11-08T07:25:14+5:30

जगभरातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून कर्मचारी कपात सुरू झाली आहे.

Wave of job cuts Companies have sent many workers home this year a cautious move amid fears of a recession | नोकरकपातीची लाट! कंपन्यांनी यावर्षी अनेक कर्मचाऱ्यांना बसविले घरी, मंदीच्या धास्तीने सावध पाऊल

नोकरकपातीची लाट! कंपन्यांनी यावर्षी अनेक कर्मचाऱ्यांना बसविले घरी, मंदीच्या धास्तीने सावध पाऊल

न्यूयॉर्क :

जगभरातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून कर्मचारी कपात सुरू झाली आहे. ट्विटरच्या कर्मचारी कपातीच्या घोषणेमुळे खळबळ उडाली होती. त्यातच आता मार्क झुकेरबर्ग यांची मेटा आणि जागतिक ऑनलाइन कम्युनिटी प्लॅटफॉर्म ब्रेनलीने कर्मचारी कपात जाहीर केली आहे. याशिवाय ॲक्सेंचर या कंपनीनेही अनेक जणांना बनावट अनुभवाचे प्रमाणपत्र सादर केल्यामुळे घरचा रस्ता दाखविला आहे. गेल्या महिन्यात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरी बसविले. अशाप्रकारे कर्मचारी कपात सुरू झाल्यामुळे मंदीची भीती निर्माण झाली आहे.  

मेटा ही फेसबुकची मूळ कंपनी आहे. मेटामधील किती कर्मचारी काढले जाणार आहेत, याची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी २००४ मध्ये स्थापना झाल्यापासूनची ही कंपनीतील सर्वांत मोठी कर्मचारी कपात असणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

प्राप्त माहितीनुसार, सप्टेंबर २०२२ च्या अखेरपर्यंत मेटामध्ये ८७,३१४ कर्मचारी होते. मेटा ही व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसह जगातील काही सर्वांत मोठ्या समाजमाध्यम प्लॅटफॉर्मची मालक आहे. 

८७ हजार मेटामधील एकूण कर्मचारी
$६७ हजारने घटले शेअर्सचे मूल्य

ट्विटरने काढले निम्मे कर्मचारी
- इलॉन मस्क यांनी ताबा घेतल्यानंतर ट्विटरने ७५०० कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ५० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. 
- ट्विटरचे भारतात २०० पेक्षा अधिक कर्मचारी होते. त्यातील सुमारे १८० जणांना काढण्यात आले आहे.  

यामुळे ‘मेटा’ तोट्यात...
लो ॲडाप्टेशन रेट आणि महागड्या आर अँड डीमुळे कंपनी सातत्याने तोट्यात आहे. याशिवाय टीकटॉसारख्या ॲपचे आव्हान, ॲपलने प्रायव्हसी धाेरणात केलेला बदल, रेग्युलेशन आदी अनेक कारणांमुळे कंपनीचा तिमाही निकाल खराब हाेता. गेल्या महिन्यात तिमाही कामगिरी जाहीर झाल्यानंतर कंपनीचे समभाग ७० टक्क्यांनी घसरले आहेत. 

कपातीचा ट्रेंड
एप्रिल ते जून    ५,५००
जुलै ते सप्टेंबर    ३०००

ब्रेनलीकडून भारतात मोठी कपात
- ऑनलाइन कम्युनिटी लर्निंग प्लॅटफॉर्म ब्रेनलीने मोठी कर्मचारी कपात केली आहे. भारतातील ३५ पैकी ३० लोकांना नोकरीवरून काढले असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीचे बंगळुरूमध्ये कार्यालय आहे. 
- कंपनीने भारतातील फक्त ५ लोकांना कायम ठेवले आहे. हे ५ लोक मागील ५ वर्षांपासून कंपनीत असून, सध्या वर्क फ्रॉम होम करीत आहेत. 
- काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांत ५० टक्के महिला आहेत. त्यांना केवळ २ ते ३ महिन्यांपूर्वीच भरती करण्यात आले होते.

अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्यांना ॲक्सेंचरने बसविले घरी
बनावट कागदपत्रे व अनुभव प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयटी कंपनी ॲक्सेंचरने दणका दिला आहे. भारतातील सुमारे १० ते १२ हजार कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केल्याची माहिती सुत्रांनी दिली. बनवेगिरी करणाऱ्यांना क्षमा नाही, असे कंपनीने म्हटले आहे. तसेच आम्ही कर्मचारी भरती सुरूच ठेवणार असून, पात्र उमेदवारांच्या नोकरीवर कुठल्याही प्रकारे गदा येणार नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. कोरोनाकाळात नियुक्त कर्मचाऱ्यांवर कंपनीची नजर असून, त्यांची माहिती तपासण्यात येत आहे.

एका प्रमाणपत्रासाठी २० ते २५ हजार रुपये
ॲक्सेंचरने केलेल्या कारवाईनंतर एक मोठा मुद्दा समोर आला आहे. या क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकजण अशा प्रकारे बनावट प्रमाणपत्रासाठी २० ते २५ हजार किंवा त्यापेक्षाही जास्त रक्कम मोजायला तयार असतात. अनुभव दिसला की नोकरीही मिळते आणि त्याआधारे पगारही वाढवून मिळतो. मात्र, अशा कर्मचाऱ्यांच्या स्किल्समध्ये फरक दिसल्यानंतर कंपनीने कठोर पडताळणी सुरू केली होती.

‘विप्राे’ने दुसरीकडे नाेकरी करणाऱ्या ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
- स्नॅपचॅटची मूळ कंपनी स्नॅपने सुमारे २० टक्के कर्मचारीकपात केली.
- मायक्राेसाॅफ्टने नुकतेच १ हजार कर्मचाऱ्यांना काढले.
- ईकाॅमर्स स्टार्टअप ‘उडान’ने ३५० कर्मचाऱ्यांना कमी केले आहे.
- बायजूस, अनअकॅडमी, वेदांतू, व्हाईटहॅट ज्यूनियर, ओला इ. कंपन्यांनीही यावर्षी भारतात माेठी कर्मचारीकपात केली आहे. 


 

 

Web Title: Wave of job cuts Companies have sent many workers home this year a cautious move amid fears of a recession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी