Vi Share Price Today: टेलिकॉम क्षेत्रात खळबळ माजवत Vi (Vodafone Idea Limited) च्या शेअर्समध्ये नुकतीच मोठी वाढ पाहायला मिळाली. कंपनीनं नेतृत्वात मोठा बदल करत कुमार मंगलम बिर्ला यांची पुन्हा एकदा 'नॉन-एग्जीक्यूटिव्ह चेअरमन' म्हणून नियुक्ती केली आहे. या बातमीनंतर ६ मे रोजी बाजार उघडताच कंपनीचा शेअर सुमारे ४% वधारून ₹११.२४ वर पोहोचला, जो गुंतवणूकदारांच्या वाढत्या विश्वासाचं प्रतीक मानल जात आहे.
सुमारे ५ वर्षांपूर्वी आर्थिक दबावामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा देणाऱ्या बिर्ला यांच्या पुनरागमनाचे बाजारानं सकारात्मक स्वागत केलं आहे. दरम्यान, रविंदर टक्कर यांनी अध्यक्षपद सोडलं असून आता ते 'नॉन-एग्जीक्यूटिव्ह व्हाईस चेअरमन'ची भूमिका सांभाळणार आहेत. यामुळे कंपनीत अनुभव आणि सातत्य दोन्ही टिकून राहील.
Vi चा संघर्ष आणि आव्हानं
आदित्य बिर्ला ग्रुप आणि व्होडाफोन ग्रुप यांनी २०१६ मध्ये रिलायन्स जिओच्या प्रवेशानंतर निर्माण झालेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी 'Vi' ही संयुक्त कंपनी स्थापन केली होती. मात्र, कंपनीला प्रचंड कर्ज आणि AGR थकबाकी यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागला, ज्यामुळे तिची आर्थिक स्थिती कमकुवत झाली. २०२१ मध्ये सरकारनं टेलिकॉम क्षेत्राला दिलासा देण्यासाठी एक पॅकेज जाहीर केलं होतं, ज्या अंतर्गत Vi च्या काही थकबाकीचं रूपांतर इक्विटीमध्ये करण्यात आलं. यामुळे सरकार या कंपनीतील सर्वात मोठी भागधारक बनली आहे.
सरकारी मदतीचा दिलासा
२०२३ आणि २०२५ मध्येही स्पेक्ट्रम आणि AGR शी संबंधित हजारो कोटी रुपयांचे इक्विटीमध्ये रूपांतर करण्यात आले. डिसेंबर २०२५ मध्ये सरकारने AGR थकबाकीवर अंशतः 'मोरेटोरियम' दिला, ज्यामुळे पेमेंट २०३० नंतरपर्यंत पुढे ढकललं गेलं. यामुळे कंपनीला रोख रकमेच्या टंचाईतून तात्पुरता दिलासा मिळाला. नुकतंच दूरसंचार विभागानं (DoT) कंपनीच्या AGR थकबाकीमध्ये २७% कपात करून ती ₹६४,०४६ कोटी केली आहे, जी पूर्वी ₹८७,६९५ कोटी होती.
शेअरची कामगिरी
व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये आज पुन्हा एकदा शानदार तेजी पाहायला मिळाली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर कंपनीचा शेअर २.८७% च्या वाढीसह ₹११.११ वर व्यवहार करत आहे. गेल्या ३० दिवसांत या टेलिकॉम स्टॉकनं २७% वाढ नोंदवली आहे. आज ६ मे २०२६ रोजी बाजार उघडताच शेअर ४% वाढून ₹११.२४ पर्यंत पोहोचला होता.
कुमार मंगलम बिर्ला यांचे पुनरागमन, सरकारी दिलासा आणि धोरणात्मक बदलांमुळे Vi साठी नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. आव्हानं अजूनही कायम असली, तरी हे बदल कंपनीला पुन्हा मजबूत बनवू शकतील का आणि कंपनी टेलिकॉम क्षेत्रातील आपली गमावलेली पकड पुन्हा मिळवू शकेल का, याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
