lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्याजदर कायम; मात्र विकासदर घटण्याची भीती- शक्तिकांत दास

व्याजदर कायम; मात्र विकासदर घटण्याची भीती- शक्तिकांत दास

रिझर्व्ह बँकेने केली पतधोरणाची घोषणा; एमएसएमईला मिळणार अधिक कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 06:11 AM2021-06-05T06:11:51+5:302021-06-05T06:12:13+5:30

रिझर्व्ह बँकेने केली पतधोरणाची घोषणा; एमएसएमईला मिळणार अधिक कर्ज

RBI keeps interest rates unchanged cuts GDP growth forecast to 9 5 per cent | व्याजदर कायम; मात्र विकासदर घटण्याची भीती- शक्तिकांत दास

व्याजदर कायम; मात्र विकासदर घटण्याची भीती- शक्तिकांत दास

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबर्ई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेचा विकासदर अपेक्षेपेक्षा कमी होण्याची भीती व्यक्त करतानाच अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठीची अनुकूल भूमिका पुढे चालू ठेवत व्याजदर कायम ठेवत असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली. पतधोरणविषयक समितीच्या बैठकीत झालेल्या समग्र चर्चेनंतर दास यांनी शुक्रवारी द्वैमासिक पतधोरणाची घोषणा केली. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्थेशी संबंधित विविध बाबींचा सखोल आढावाही घेतला. 

सध्या असलेला ४ टक्के रेपो दर तसेच ३.३५ टक्क्यांचा रिव्हर्स रेपो दर हा कायम ठेवत असल्याची घोषणा दास यांनी केली. देशातील उद्योगधंद्यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. उद्योगांना मदत करण्याच्या उद्देशाने सध्या असलेले व्याजदर कायम ठेवत असल्याचे दास यांनी सांगितले. सध्या देशातील कर्जावरील व्याजदर हे खालच्या पातळीवर आहेत. पुढील दोन महिने ते कायम राखण्याचा निर्णय पतधोरण समितीने एकमताने घेतला आहे. त्याचबरोबर अजूनही दर कपात करणे शक्य असल्याचे संकेतही दास यांनी दिले आहेत. 

सध्याच्या परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेच्या विकासाला बळ देण्यासाठी ज्या ज्या मार्गांनी मदत करणे शक्य आहे, त्या सर्व मार्गांनी मदत केली जाणार आहे. अर्थव्यवस्थेमध्ये अधिक निधी उपलब्ध व्हावा, यासाठी १७ जूनला ४० हजार कोटी रुपयांची बॉण्ड खरेदी आरबीआय करणार आहे.  एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये आरबीआयने १ लाख कोटी रुपयांची बॉण्ड खरेदी केली असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दुसऱ्या तिमाहीमध्ये १.२ ला‌ख कोटी रुपयांची बॉण्ड खरेदी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेवर काही परिणाम झाला आहे. मात्र तो मागील लाटेपेक्षा कमी आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षामध्ये अर्थव्यवस्थेचा विकासदर ९.५ टक्के राहण्याचा सुधारित अंदाज असल्याचे दास यांनी सांगितले. आधीच्या अंदाजापेक्षा विकासदर १ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. या वर्षामध्ये देशातील महागाईतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त करून चलनवाढीचा दर ५.१ टक्क्यांवर जाण्याची शक्यता असल्याचेही दास यांनी सांगितले. 

कोरोनामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि पर्यटन या क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. त्यांना मदत मिळावी या उद्देशाने रेपो दराने या उद्योगांना १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यासाठीची विशेष योजना ३१ मार्च, २०२२ पर्यंत सुरू ठेवली जाणार आहे. 

परकीय चलन गंगाजळी ६०० अब्ज डॉलरपार
देशाच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये मोठ्या वेगाने वाढ होत असून, यामधील रक्कम ६०० अब्ज डॉलरचा टप्पा पार करून गेल्याची माहिती रिझर्व्ह  बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. सध्याच्या एकूणच परिस्थितीचा विचार करता परकीय चलन गंगाजळीने ६०० अब्ज डॉलरचा आकडा पार केला असावा. मात्र, अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर होणे बाकी आहे.

व्यापार, उद्योगाला दिलासा 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसलेल्या व्यापार  आणि उद्योग क्षेत्राला यावेळी दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मे महिन्यामध्ये वैयक्तिक कर्जदार, छोटे व्यापारी आणि एमएसएमई यांच्यासाठी कर्ज पुनर्रचना  योजना सुरू केली आहे. यामध्ये २५ कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाची पुनर्रचना करता येत आहे. आता या योजनेची व्याप्ती वाढवून त्याची मर्यादा ५० कोटी रुपये अशी दुप्पट करण्यात आली आहे. यामुळे अधिक व्यक्ती व संस्था या योजनेसाठी पात्र ठरू शकणार आहेत. याशिवाय हॉटेल आणि पर्यटन या मोठा फटका बसलेल्या क्षेत्रालाही दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. या क्षेत्रांना रेपो दरावर आधारित कर्ज तीन वर्षांसाठी घेता येणार असून, त्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात येणार आहे. याआधी जाहीर करण्यात आलेल्या ५० हजार कोटींच्या रकमेपेक्षा हा निधी जास्तीचा आहे.

चलनवाढ जाणार ५.१ टक्क्यांवर
चालू आर्थिक वर्षामध्ये चलनवाढीचा दर ५.१ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज असल्याचे दास यांनी स्पष्ट केले. चलनवाढीचा दर ४ टक्क्यांवर राखण्यासाठी पतधोरण समितीने प्रयत्न केले आहेत. यापेक्षा दर दोन टक्के वर अथवा खाली होणे हे अपेक्षित आहे. त्यामुळे ५.१ टक्के राहणारा चलनवाढीचा दर हा योग्य असल्याचे मत दास यांनी व्यक्त केले. 

जगभरामध्येच वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ होत असल्यामुळे आपल्याकडेही महागाई वाढणे साहजिक असल्याचे दास यांनी सांगितले. महागाई रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगुन विस्कळीत झालेली पुरवठा साखळी सुरळीत होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

Web Title: RBI keeps interest rates unchanged cuts GDP growth forecast to 9 5 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.