Rajnath Singh Germany Visit: भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मंगळवारपासून जर्मनीच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारत आणि जर्मनीमधील संरक्षण भागीदारी अधिक मजबूत करणे हा आहे.
या भेटीत ते जर्मनीचे संरक्षणमंत्री बोरीस पिस्टोरीया, तसेच इतर वरिष्ठ नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, या चर्चेत संरक्षण उद्योगातील सहकार्य, लष्करी संबंध अधिक बळकट करणे आणि सायबर सुरक्षा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोनसारख्या नव्या क्षेत्रांतील संधींवर भर दिला जाणार आहे.
‘प्रोजेक्ट 75I’वर मोठा निर्णय शक्य
या दौऱ्यात सर्वाधिक लक्ष ‘Project 75I’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर आहे. या अंतर्गत भारतात पुढील पिढीच्या ६ पारंपरिक पाणबुड्या तयार करण्याचा प्रस्ताव आहे. याचा अंदाजित खर्च ₹७०,००० ते ₹९९,००० कोटी रुपये असून, हा Mazagon Dock Shipbuilders Limited, मुंबई येथे तयार केला जाईल. या प्रकल्पासाठी ThyssenKrupp Marine Systems (TKMS) सोबत भागीदारी केली जाऊ शकते. या प्रकल्पांतर्गत AIP (Air Independent Propulsion) तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, ज्याद्वारे पाणबुड्या अनेक आठवडे पाण्याखाली राहू शकतात. हा करार अंतिम टप्प्यात असून, लवकरच औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.
डिफेन्स इंडस्ट्रियल रोडमॅपवर सह्या होण्याची शक्यता
२१ ते २४ एप्रिलदरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात डिफेन्स इंडस्ट्रियल कोऑपरेशन रोडमॅप आणि संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमांसाठी प्रशिक्षण सहकार्य यासंबंधी करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.
‘मेक इन इंडिया’ला चालना
या भेटीत जर्मन संरक्षण उद्योगातील प्रमुख कंपन्यांशीही चर्चा होणार आहे. याचा उद्देश संयुक्त उत्पादन आणि सह-विकास वाढवणे, ‘Make in India’ उपक्रमाला चालना देणे आणि भारतीय कंपन्यांना युरोपीय बाजारपेठेत संधी मिळणे, असा आहे. भारतीय कंपन्याही जर्मन आणि युरोपीय सैन्याला आपली उत्पादने सादर करण्यास उत्सुक आहेत.
७ वर्षांनंतरचा महत्त्वाचा दौरा
भारतीय संरक्षणमंत्र्यांचा जर्मनी दौरा तब्बल ७ वर्षांनंतर होत आहे. यापूर्वी २०१९ मध्ये निर्मला सीतारामन यांनी जर्मनीला भेट दिली होती. तसेच बोरिस पिस्टोरियस यांनी २०२३ मध्ये भारत दौरा करून द्विपक्षीय संबंधांना चालना दिली होती.
