Middle East Tensions : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता विकोपाला गेला असून, याचा थेट परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर दिसून येत आहे. या तणावामुळे कच्च्या तेलाचे दर थेट ११९ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत, जो २०२२ नंतरचा उच्चांक आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या परिस्थितीवर गंभीर भाष्य करताना, "आगामी काही आठवड्यांत हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊ शकते," अशी भीती व्यक्त केली आहे.
जागतिक पुरवठ्यासमोर 'हॉर्मुज'चे संकट
हॉर्मुजची सामुद्रधुनी ही जगातील तेल आणि वायू पुरवठ्याची मुख्य रक्तवाहिनी मानली जाते. जगातील एकूण तेल आणि वायू पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के पुरवठा याच मार्गाने होतो. या मार्गावर इराणचा प्रभाव असल्याने आणि तिथे सुरू असलेल्या संघर्षामुळे इंधन पुरवठा विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे.
पुतिन यांची रशियाच्या तेल कंपन्यांना 'अॅलर्ट'ची सूचना
वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि रशियन तेल कंपन्यांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत पुतिन यांनी स्पष्ट केले की, मध्य-पूर्वेतील बिघडलेली परिस्थिती रशियासाठी संधी ठरू शकते. पुतिन यांनी युरोपियन युनियनला रशियासोबत दीर्घकालीन ऊर्जा सहकार्याची तयारी दर्शवली आहे. रशिया हा जगातील दुसरा सर्वात मोठा तेल निर्यातदार आणि वायूचा मोठा साठा असलेला देश आहे. या युद्धजन्य स्थितीमुळे वाढलेल्या तेलाच्या किमतींचा फायदा उठवण्यासाठी रशियन तेल कंपन्यांनी सज्ज राहावे, असे संकेत पुतिन यांनी दिले आहेत.
वाचा - तेल साम्राज्यावर कुणाचे वर्चस्व? 'या' आहेत जगाताली टॉप १० कंपन्या; यात भारताचं स्थान कुठे?
जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम
तज्ज्ञांच्या मते, तेलाच्या किमती ११९ डॉलरच्या पलीकडे जाणे हे जागतिक महागाईसाठी अत्यंत घातक आहे. इंधन महागल्यामुळे जगभरातील महागाई वाढून आर्थिक विकासाचा वेग मंदावू शकतो. भारतासारख्या तेल आयातदार देशांसाठी हे मोठे संकट असून, यामुळे आयात बिल प्रचंड वाढणार आहे.
