lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बालक विमा योजनेत गुंतवणूक करून पाल्यांना उज्ज्वल भविष्याची भेट द्या!

बालक विमा योजनेत गुंतवणूक करून पाल्यांना उज्ज्वल भविष्याची भेट द्या!

मूल आपल्या सुरुवातीच्या आयुष्यातील बराच काळ आपल्या पालकांवर अवलंबून असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 07:47 PM2020-03-20T19:47:14+5:302020-03-20T19:47:50+5:30

मूल आपल्या सुरुवातीच्या आयुष्यातील बराच काळ आपल्या पालकांवर अवलंबून असते.

Invest in a child insurance plan and give to the children a bright future! | बालक विमा योजनेत गुंतवणूक करून पाल्यांना उज्ज्वल भविष्याची भेट द्या!

बालक विमा योजनेत गुंतवणूक करून पाल्यांना उज्ज्वल भविष्याची भेट द्या!

तुमचे आयुष्य कशाभोवती फिरते, असा प्रश्न जर तुम्ही कुठल्या पालकाला विचारला तर त्याचे स्वाभाविक उत्तर “माझे मूल” हेच असेल. आपल्याकडून केल्या जाणाऱ्या कृती, महत्त्वाचे निर्णय आणि भविष्यातील योजना या आपल्या प्रिय मुलांच्या भावी वाटचालीशी, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांशी इतक्या निगडित असतात की, आपण अगदी सुरुवातीपासूनच चांगल्या शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या मूल्यमापनाला सुरुवात करतो, अभ्यासबाह्य छंदांची जोपासना करण्यासाठी कुठे नाव नोंदवला येईल, याचे पर्याय शोधतो आणि मुलांचे उच्चशिक्षण आणि त्यांच्या विवाहासाठी बचत करू लागतो. या सर्व प्रक्रियेत आपल्या पाल्याच्या सुरक्षित भविष्यासाठी ज्या बाबींची तजवीज करायची, त्यासाठी आर्थिक सुरक्षितता आणि स्थैर्य हे सर्वोच्च प्राधान्याचे मुद्दे बनतात.

कुटुंबाचा विस्तार करण्याचे नियोजन करण्यापूर्वीच पालक आर्थिक नियोजनाला सुरुवात करतात, कारण मुलांचे संगोपन ही खर्चिक बाब असते. त्यामुळेच आपल्या मुलांना भविष्यात त्यांच्या आणि तुमच्या स्वप्नांची पूर्तता करताना बघायचे असेल तर अगदी सुरुवातीपासूनच निधी उभारणीला सुरुवात केली पाहिजे. गुंतवणुकीचा सुरक्षित पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी बालक विमा योजना हा अपरिहार्य घटक आहे. त्याची कारणे खालीलप्रमाणे :

तुमच्या पाल्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या वर्षांमध्ये बालक विमा योजना आर्थिक सुरक्षितता पुरवते

मूल आपल्या सुरुवातीच्या आयुष्यातील बराच काळ आपल्या पालकांवर अवलंबून असते. यामुळे पालक बऱ्याचदा वाढत्या खर्चामुळे आर्थिक नियोजनाच्या बचावात्मक फेऱ्यात ढकलले जातात. मात्र, लवकर सुरुवात केल्यास बालक विमा योजनांमुळे आर्थिक नियोजन सुलभ होते, तसेच भविष्यासाठी मोठ्या प्रमणावर निधी उभारणीची सुरक्षितताही प्राप्त होते. बचत, गुंतवणूक आणि विमा यांचे यथायोग्य मिश्रण एकाच योजनेत असलेल्या बालक विमा योजनेमुळे कायमस्वरुपी मनःशांती लाभेल याची खात्री मिळते. याचे कारण कुठल्याही कारणामुळे आपल्या नेहमीच्या आयुष्यात काही अडथळे उभे राहिले अथवा खर्च वाढता राहिला तरी तुमचे मूल त्याचे आयुष्य निर्वेधपणे पार पाडू शकेल, याची शाश्वती या योजनेमुळे मिळते. उदा. तुमचे मूल १४ ते २४ वयोगटात असताना अधिक प्रमाणात खर्च होण्यास सुरुवात होते. याच कालावधीत चांगल्या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी भक्कम आर्थिक पाठबळ आवश्यक असते. तुम्ही नियमितपणे प्रीमिअम भरला तर योजनेचा कालावधी संपल्यानंतर तुम्हाला योजनेचे सर्व लाभ मिळतात आणि अपत्याच्या उच्च शिक्षणाच्या नेमक्या वेळी तुमच्याकडे आवश्यक निधी उपलब्ध होतो.

मुलांची स्वप्ने आणि आकांक्षांच्या बाबतीत तडजोड करावी लागू नये, यासाठी रक्कम काढून घेण्यातील सुलभता

मुदतीअंती मिळणाऱ्या रकमेमुळे मोठ्या खर्चाची सोय होत असली तरी मुदतीपूर्वीच अचानक एखादे आर्थिक संकट उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या पाल्याला एखाद्या महागड्या शिक्षणबाह्य उपक्रमात सहभागी व्हायची इच्छा होऊ शकते. मुलांच्या इच्छाआकांक्षा आणि गरजांच्या पूर्ततेत तडजोड करावी लागू नये, यासाठी ग्राहकाच्या गरजेनुसार योजनेचे स्वरुप ठरवून मध्यम कालावधीच्या खर्चासाठी पाल्याच्या विमानिधीतून नियमित अंतराने ठराविक रक्कम काढण्याची सुविधाही विमाकंपनी उपलब्ध करून देते. या सुविधेमुळे नियमित उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ न बिघडवता अचानक उद्भवलेल्या खर्चाची पूर्तता करण्याची लवचिकता प्राप्त होते. काही बालक विमा योजनांमध्ये तर कुटुंबाच्या आर्थिक गरजांवर ताण येऊ नये, यादृष्टीने विमानिधी मुदतीआधी अथवा मुदतीनंतर काही कालावधीने काढण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते.

एकाच योजनेत गुतंवणूक आणि बचतीच्या योग्य मिश्रणाची सुविधा

विमा कंपन्या बालक विमा योजनांच्या माध्यमातून पालकांना शिस्तबद्ध बचतीची सवय लावतात, ज्याचा उपयोग पाल्याच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर होऊ शकतो. या योजना बाजारपेठेशी निगडितही असू शकतात, ज्यायोगे धोका पत्करण्याची तुमची तयारी आणि आर्थिक गरजा यांचा विचार करून गुंतवणुकीचे धोरण निश्चित करून तुम्ही उच्च धोका असलेल्या इक्विटी किंवा कमी धोका असलेल्या डेट साधनांमध्ये गुंतवणूक करू शकता. तुमच्या पाल्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांचा विचार करून त्यानुसार लागणारा अंदारे खर्च व आर्थिक गरजा यांचा ताळेबंद मांडणे कधीही श्रेयस्कर असते. नियोजनबद्ध हस्तांतरण योजना (सिस्टमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन) आणि बदलते निधी वाटप (डायनॅमिक फंड अॅलोकेशन) आदी धोरणांच्या माध्यमातून बाजारपेठेतील उलथापालथापासून संरक्षण मिळते आणि आपल्या अपत्याचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत होते.

तुमच्या अनुपस्थितीतही तुमच्या पाल्याच्या भविष्याचे रक्षण करते

आपल्याविना आपल्या पाल्यावर त्याच्या भवितव्याला आकार देण्याची वेळ यावी, हा विचारच अस्वस्थ करणारा आहे. या विमायोजना मुलांच्या भविष्यातील गरजांसाठी आवश्यक निधीची उभारणी करण्यासाठी असले तरी पालकाचा आकस्मिक मृत्यू झाल्यास आर्थिक सुरक्षितता देण्याचे कामही या योजना करतात. विमा कंपनीकडून देण्यात येणारा मृत्यूपश्चात लाभ हा बालक विमा योजना खरेदी करण्यामागील सर्वात मोठा लाभ आहे. तुमच्या अनुपस्थितीतही मुलाच्या भावी वाटचालीत कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी योजनेत नामांकन करण्यात आलेल्या व्यक्तीस (नॉमिनी) संरक्षित रक्कम त्वरित अदा केली जाते. या योजनांमध्ये अनुस्यूत असलेले आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्याच्या नावे विमा आहे, त्या पालकाचा मृत्यू झाल्यास विमाकंपनी विम्याचे पुढील हप्ते (प्रीमिअम) माफ करू शकते. त्यामुळे संरक्षित रक्कम मिळण्याबरोबरच पुढील हप्ते भरण्याचा भारही कुटुंबावर राहात नाही, शिवाय योजनेच्या मुदतीअखेरीस अपत्याला मुदतपूर्तीची रक्कमही मिळते.

आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल असावे, ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. योग्य शिक्षण आणि त्याजोडीला आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर लागणाऱ्या गरजांची पूर्तता यासाठी सुयोग्य आर्थिक नियोजनाची आवश्यकता असते. लवकरात लवकर हे नियोजन सुरू करणे आणि महागाई आणि व्याजदर यांसारखे सतत बदलणारे घटक लक्षात घेणे हे या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मुदतीअंती मिळणाऱ्या रकमेचा अधिकाधिक लाभ घेता यावा, यासाठी मुलांच्या वाढत्या वयातील महत्त्वाच्या टप्प्यांवर कराव्या लागणाऱ्या खर्चाचे योग्य नियोजन करावे. तुलनेने किरकोळ खर्चात बालक विमा योजना अधिक सुदृढ करण्यासाठी जीवावर बेतणारे आजार (क्रिटिकल इलनेस), वैयक्तिक अपघात लाभ यांसारख्या मुद्द्यांचा समावेशही करता येऊ शकतो. आर्थिक बाबींची चिंता करत बसण्यापेक्षा आपल्या कुटुंबाच्या गरजांची पूर्तता करणारी बालक विमा योजना खरेदी करा आणि आपल्या पाल्याच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करा 

- आलोक भान, चीफ मार्केटिंग ऑफिसर, मॅक्स लाइफ

Web Title: Invest in a child insurance plan and give to the children a bright future!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.