Indian Railways: भारतीय रेल्वेच्या उत्तर मध्य रेल्वे (NCR) झोनने महसूल वाढीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लोखंडी साहित्य आणि भंगार विक्रीतून तब्बल ३१७ कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवले आहे. याशिवाय, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करून १४८ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय, मालवाहतुकीतही २१ मिलियन टनांपेक्षा जास्त मालाची वाहतूक करून नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे.
स्वच्छता अन् कमाई...
रेल्वे यार्ड, वर्कशॉप आणि ट्रॅकच्या कडेला साचलेले जुने लोखंड, बिनकामाचे साहित्य आणि भंगाराची लिलावाद्वारे विक्री करण्यात आली. या उपक्रमाला "कबाड़ से जुगाड़" असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेमुळे रेल्वेला मोठा महसूल तर मिळालाच, शिवाय स्टेशन आणि यार्ड परिसर अधिक स्वच्छ झाले.
विनातिकीट प्रवाशांवर कडक कारवाई
रेल्वे प्रशासनाने विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत १४८ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. याशिवाय एनसीआर झोनने यंदा २१ मिलियन टनांपेक्षा अधिक मालवाहतूक केली आहे, जो मागील काही वर्षांतील सर्वोत्तम आकडा मानला जात आहे. यामुळे रेल्वेच्या महसुलात वाढ झाली आणि लॉजिस्टिक्स कार्यक्षमतेत सुधारणा असे अधिकाऱ्यांचे मत आहे.
उत्तर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शशिकांत त्रिपाठी यांनी सांगितले की, ही कामगिरी उत्तम नियोजन, कडक देखरेख आणि टीमवर्कचा परिणाम आहे. पुढील काळातही आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी रेल्वे सज्ज आहे.
