Kuwait Crude Halt: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. टँकर ट्रॅकर्सच्या अहवालानुसार, कुवैतने एप्रिल २०२६ मध्ये कच्च्या तेलाचा एकही बॅरल निर्यात केलेला नाही. गेल्या तीन दशकांत पहिल्यांदाच कुवैतसाठी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जर या वृत्ताची अधिकृत पुष्टी झाली, तर १९९१ मधील खाडी युद्धानंतर कुवैतच्या इतिहासात पहिल्यांदाच मासिक कच्च्या तेलाची निर्यात शून्यावर आल्याची नोंद होईल.
उत्पादन सुरू, पण निर्यात ठप्प...
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, कुवैतमध्ये तेल उत्पादन सुरू असले तरी एप्रिलमध्ये निर्यात झाली नाही. अहवालानुसार, काही तेल साठवणूक (स्टोरेज) मध्ये ठेवले जात आहे, तर उर्वरित तेलाचे रिफाइंड प्रॉडक्ट्समध्ये रूपांतर करून त्याची निर्यात केली जात आहे.
BREAKING: DURING APRIL 2026, KUWAIT EXPORTED ZERO BARRELS OF CRUDE OIL FOR THE FIRST TIME SINCE THE END OF GULF WAR I#OOTT#IranWar#Tankers#Kuwait
— TankerTrackers.com, Inc. (@TankerTrackers) May 2, 2026
निर्यात बंद होण्याचे कारण काय
तज्ज्ञांच्या मते, प्रादेशिक शिपिंग मार्गांमध्ये अडथळे, होर्मुझ सामुद्रधुनीतील वाढता तणाव, सुरक्षेच्या कारणास्तव तेलवाहतूक कमी होणे आणि कतारची इराणला संयमाची विनंती...यामुळे निर्यातीत अडचणी येत आहेत.
होर्मुझ सामुद्रधुनीवर गंभीर इशारा
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल-थानी यांना इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचा दूरध्वनी आला होता. या चर्चेदरम्यान जहाजांची वाहतूक अबाधित ठेवण्यावर भर देण्यात आला. तसेच, होर्मुझ सामुद्रधुनी बंद करणे जागतिक संकट निर्माण करू शकते, असा इशारा देण्यात आला
अमेरिकेची वाढती हालचाल
दरम्यान, अमेरिका सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार, मागील २० दिवसांत ४८ जहाजांचे मार्ग बदलण्यात आले, तर होर्मुझ परिसरात अमेरिकेची सक्रियता वाढली आहे. USS New Orleans हे युद्धनौकाही अरब समुद्रात तैनात करण्यात आले आहे.
इराणची भूमिका काय?
इराणचे उप-परराष्ट्र मंत्री काझेम ग़रीबाबादी यांनी सांगितले की, पाकिस्तानमार्फत अमेरिकेला पाठवलेला अलीकडील राजनैतिक प्रस्ताव हा तणाव कमी करून दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने होता. त्यांनी स्पष्ट केले की, इराण चर्चा करण्यास तयार आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारीही ठेवली आहे.
