Fake Wedding : आजकालच्या बदलत्या काळात काहीतरी हटके करण्याची क्रेझ वाढत आहे. याच क्रेझमधून भारतातील मोठ्या शहरांमध्ये 'बनावट लग्न' नावाचा एक नवा ट्रेंड वेगाने लोकप्रिय होत आहे. यात खरा वधू-वर नसतो, नातेवाईकांचा गोंधळ नसतो आणि पारंपरिक विधीही खरे नसतात, पण लग्नाची मजा मात्र पूर्ण असते! दिल्ली, बेंगळुरू आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये हा 'फेक वेडिंग' ट्रेंड खूप गाजत आहे. लोक अशा 'लग्नांचा' आनंद घेण्यासाठी हजारो रुपये खर्च करत आहेत. हे केवळ मौजमजेचे साधन नसून, लाखो रुपयांचा नवा व्यवसायही बनला आहे.
खऱ्या लग्नाचा आनंद, पण 'फेक' पद्धतीने!
आजच्या 'जनरेशन झेड'मध्ये बनावट लग्नं खूप लोकप्रिय होत आहेत. या कार्यक्रमांमध्ये तुम्हाला खऱ्या लग्नात मिळणाऱ्या सर्व गोष्टी मिळतात.
- फुलांनी सजवलेला मंडप
- रंगीबेरंगी कपडे
- ढोल ताशांचा दणदणाट
- वरातीची धमाकेदार एन्ट्री
- आणि अगदी बनावट 'वरमाळा' सुद्धा!
पण गंमत अशी की, इथे खरे वधू-वर नसतात, ना नातेवाईकांचा गोंधळ. लोक अशा लग्नांना फक्त नाचण्यासाठी, स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आणि इंस्टाग्रामसाठी भन्नाट रील्स बनवण्यासाठी जात आहेत. सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यात ढोल-ताशांच्या गजरात वरात येत आहे, लोक नाचत आहेत आणि एक अभिनेता पुजाऱ्याची भूमिका साकारून मंत्रही म्हणत आहे!
लग्नाला उपस्थित राहण्यासाठी तिकीट खरेदी करा!
अनेक ठिकाणी हे बनावट लग्न तिकीट कार्यक्रम म्हणून आयोजित केले जात आहेत. तिकिटाची किंमत १४९९ रुपयांपासून सुरू होते आणि कधीकधी हजारो रुपयांपर्यंत जाते. दिल्ली, बंगळुरू, पुणे यांसारख्या शहरांमध्ये, या पार्ट्या छतावरील बार, कॉलेज कॅम्पस किंवा तात्पुरत्या ठिकाणी मोठ्या थाटामाटात आयोजित केल्या जातात.
काही ठिकाणी तुम्ही तिकिटाशिवायही प्रवेश करू शकता, पण तुम्हाला खाण्यापिण्याचे पैसे द्यावे लागतात. या कार्यक्रमांचा उद्देश म्हणजे लोकांना लग्नाचा पुरेपूर आनंद घेता यावा, कोणताही अतिरिक्त खर्च न करता, कोणताही त्रास न घेता आणि नातेवाईकांच्या 'ड्रामा'शिवाय!
'बनावट लग्नात' काय काय होतं?
- बनावट लग्नांना खऱ्या लग्नासारखे दिसण्यासाठी कोणतीही कसर सोडली जात नाही. इथे पूर्ण लग्नाचा अनुभव मिळतो.
- निमंत्रण पत्रिका: खऱ्या लग्नासारख्या छापलेल्या पत्रिका पाहुण्यांना पाठवल्या जातात.
- बनावट नवरदेव-नवरी: व्यावसायिक कलाकार किंवा मित्रांना वधू-वराची भूमिका दिली जाते.
- सजावट आणि मंडप: फुलांनी, थीम-आधारित सजावट आणि आकर्षक प्रकाशयोजनांनी मंडप सजवलेला असतो.
- संगीत आणि मिरवणूक: डीजे, बँड, ढोल आणि भव्य वरातीची एन्ट्री असते.
- फोटो आणि व्हिडिओ: व्यावसायिक फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर संपूर्ण पार्टीचे फोटो आणि रिल्स बनवतात.
- बनावट विधी: हळदी, मेहंदी, संगीत आणि अगदी बनावट लग्न समारंभही केले जातात.
- बनावट नातेवाईक: नातेवाईकांची भूमिका करणारे मित्र किंवा कलाकारही असतात.
हे सर्व मिळून लग्नाचे असे वातावरण तयार करतात जे अगदी खरे वाटते. लोक पारंपरिक कपडे घालून येतात, रील बनवतात आणि रात्रभर डान्स फ्लोअरवर धमाल करतात.
जनरेशन झेडला 'फेक वेडिंग' का आवडतेय?
आजच्या तरुण पिढीला, म्हणजेच जनरेशन झेडला, हा ट्रेंड खूप आवडत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना समुदाय आणि सर्जनशीलता आवडते. आजची तरुण पिढी लग्नाला एक मोठी जबाबदारी मानते, पण लग्नाचा आनंद घेण्यापासून त्यांना मागे राहायचे नाही. बनावट लग्नांमुळे त्यांना कोणत्याही बंधनाशिवाय पूर्ण विवाहाचा आनंद घेण्याची संधी मिळते. हे कार्यक्रम केवळ मनोरंजनाचे स्रोत नाहीत, तर ते अर्थव्यवस्थेचा एक नवीन भाग बनत आहेत.
वाचा - लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
'फेक लग्न' एक मोठे बिझनेस मॉडेल!
हे खोटे लग्न आता केवळ मौजमजेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते एक मोठे व्यवसाय मॉडेल बनत आहे. इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि व्यावसायिक नियोजक आता 'बनावट लग्न पॅकेजेस' देत आहेत, ज्यात सजावट, थीम, जेवण, संगीत आणि अगदी कलाकारांचाही समावेश असतो. काही ठिकाणी हे कार्यक्रम कॉलेज विद्यार्थ्यांद्वारे आयोजित केले जात आहेत, तर काही ठिकाणी मोठ्या जागांवर तिकीट असलेले कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. फायनान्शियल एक्सप्रेसच्या अहवालानुसार, असे कार्यक्रम आयोजित करून आयोजक लाखो रुपये कमवत आहेत.