lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Cyrus Mistry Accident: २३ व्या वर्षी व्यवसायात एन्ट्री ते रतन टाटांशी वाद; ‘अशी’ होती सायरस मिस्त्रींची कारकीर्द

Cyrus Mistry Accident: २३ व्या वर्षी व्यवसायात एन्ट्री ते रतन टाटांशी वाद; ‘अशी’ होती सायरस मिस्त्रींची कारकीर्द

Cyrus Mistry Death Latest News & Updates: सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाने उद्योग जगताला मोठा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 06:45 PM2022-09-04T18:45:44+5:302022-09-04T18:47:19+5:30

Cyrus Mistry Death Latest News & Updates: सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाने उद्योग जगताला मोठा धक्का बसला आहे.

cyrus mistry accident updates know about tata group former head cyrus mistry who sad demise in a tragic accident near palghar | Cyrus Mistry Accident: २३ व्या वर्षी व्यवसायात एन्ट्री ते रतन टाटांशी वाद; ‘अशी’ होती सायरस मिस्त्रींची कारकीर्द

Cyrus Mistry Accident: २३ व्या वर्षी व्यवसायात एन्ट्री ते रतन टाटांशी वाद; ‘अशी’ होती सायरस मिस्त्रींची कारकीर्द

मुंबई: उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे निधन झाले आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे. सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाने उद्योग जगताला मोठा धक्का बसला आहे. सायरस मिस्त्री हे प्रसिद्ध उद्योगपती पालनजी शापूरजी यांचे धाकटे पुत्र होते. सन २०१९ साली सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहाच्या प्रमुखपदाची सूत्रे सांभाळली होती. मात्र, रतन टाटांशी झालेल्या वादानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली. 

अवघ्या २३ व्या वर्षी व्यवसायात प्रवेश करत मोठी जबाबदारी खांद्यावर घेत अनेक गोष्टी सायरस मिस्त्री यांनी करून दाखवल्या. प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहणे पसंत करणारे सायरस मिस्त्री हे भारतीय उद्योग जगतातील एक मोठे नाव. सायरस मिस्त्री यांचा जन्म मुंबईतील एका पारसी कुंटुंबात झाला. उद्योगपती पालनजी मिस्त्री यांचे ते धाकटे सुपुत्र होते. त्यांनी लंडनमधील इम्पिरियल महाविद्यालयातून सिव्हील इंजीनिअरिंग आणि बीएसचे शिक्षण घेतले. तसेच त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले.

शापूरजी पालनजी ग्रुपचे संचालक म्हणून नियुक्ती

सायरस मिस्त्री यांनी लंडन बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या २३ व्या वर्षी सन १९९१ मध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाच्या पालनजी ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. १९९४ मध्ये शापूरजी पालनजी ग्रुपचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सायरस मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली शापूरजी पालनजी कंपनीने अनेक मोठे विक्रम प्रस्थापित केले. मिस्त्री यांचा विवाह प्रसिद्ध वकील इक्बाल छागला यांची कन्या रोहिका छागला यांच्याशी विवाह झाला. सायरस मिस्त्री यांना दोन सुपुत्र आहेत.

सायरस मिस्त्री हे टाटा समुहाचे सदस्य

सन २००६ साली सायरस मिस्त्री हे टाटा समुहाचे सदस्य बनले. पुढे २०१३ साली वयाच्या ४३ व्या वर्षी ते टाटा समुहाचे अध्यक्ष बनले. परंतु, शापूरजी पालनजी या उद्योगघराण्याचे वारसदार असलेले मिस्त्री यांचा ऑक्टोबर २०१६ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्ष पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २०१२ साली त्यांनी टाटा सन्सचे सहावे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्याकडून सूत्रे हाती घेतली होती. पुढे फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांना टाटा सन्सच्या संचालक पदावरून तसेच समूहातील अन्य कंपन्यांवरून काढून टाकण्यात आले होते.

सायरस मिस्त्री विरुद्ध रतन टाटांची कायदेशीर लढाई

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टीविरोधात मिस्त्री यांनी मार्च २०१७ मध्ये राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या मुंबई पीठाकडे दावा दाखल केला होता. जुलै २०१८ मध्ये न्यायाधिकरणाने त्यांचा हा दावा फेटाळून लावला. त्यावर ऑगस्ट २०१८ मध्ये अपील न्यायाधिकरणाकडे मिस्त्री यांनी धाव घेतली होती. न्यायमूर्ती एस. जे. मुखोपाध्याय यांच्या नेतृत्वाखालील दोन सदस्यीय अपील न्यायाधिकरणाने जुलैमध्ये दोन्ही पक्षांचे युक्तिवाद पूर्ण केले आणि १८ डिसेंबरला अंतिम निकाल दिला. सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष हे मूळ पद पुन्हा बहाल केले जावे, असे सांगून न्यायाधिकरणाने एन. चंद्रशेखर यांची त्या जागी केली गेलेली नियुक्तीही बेकायदेशीर ठरवली होती. टाटांना या निकालाविरोधात अपिलासाठी चार आठवड्यांचा कालावधीही अपील न्यायाधिकरणाने बहाल केला होता. त्यानुसार टाटा सन्सकडून सर्वोच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान देण्यात आले होते.

दरम्यान, भारतीय वंशाच्या सर्वात यशस्वी आणि शक्तिशाली व्यावसायिकांपैकी एक असलेले, पालनजी मिस्त्री यांच्या नेतृत्वात, भारत, पश्चिम आशिया आणि आफ्रिका अशा देशांमध्ये बांधकाम व्यावसायाचे साम्राज्य पसरले. त्यांच्या मुलांसोबत त्यांची टाटा सन्समध्ये १८.५ टक्के हिस्सेदारी आहे.
 

Web Title: cyrus mistry accident updates know about tata group former head cyrus mistry who sad demise in a tragic accident near palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.