lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीन, अमेरिका ठरवणार बाजाराची दिशा

चीन, अमेरिका ठरवणार बाजाराची दिशा

बाजारात तेजी या सप्ताहात कायम राहू शकते. अमेरिकेतील पीएमआय व बेरोजगारीची आकडेवारी या सप्ताहात जाहीर होईल.

By प्रसाद गो.जोशी | Published: March 4, 2024 03:56 PM2024-03-04T15:56:04+5:302024-03-04T15:56:18+5:30

बाजारात तेजी या सप्ताहात कायम राहू शकते. अमेरिकेतील पीएमआय व बेरोजगारीची आकडेवारी या सप्ताहात जाहीर होईल.

China America will decide the direction of the indian share market | चीन, अमेरिका ठरवणार बाजाराची दिशा

चीन, अमेरिका ठरवणार बाजाराची दिशा

बाजारात तेजी या सप्ताहात कायम राहू शकते. अमेरिकेतील पीएमआय व बेरोजगारीची आकडेवारी या सप्ताहात जाहीर होईल. चीनमधील चलनवाढही जाहीर होईल. तसेच भारतामधील पीएमआयची आकडेवारीही बाजारावर प्रभाव टाकू शकते. 
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या वाढणाऱ्या किमती बाजाराने मनावर घेतल्या नसल्या तरी त्यात अधिक वाढ झाल्यास बाजारावर विपरित परिणाम होऊ शकतो. मंगळवारी अमेरिकेच्या सेवा क्षेत्राच्या पीएमआयची आकडेवारी जाहीर होईल. ८ मार्चला भारतातील बाजार महाशिवरात्रीमुळे बंद राहणार आहेत. त्यामुळे या आकडेवारीचा प्रभाव पुढील सप्ताहात दिसू शकतो. 
 

गुंतवणूकदार ९६,५०० कोटींनी श्रीमंत 
 

बाजारात असलेल्या तेजीमुळे या सप्ताहात गुंतवणूकदार ९६,५०० कोटींहून अधिक श्रीमंत झाले. नाेंदणीकृत सर्व कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य ३ कोटी ९४ लाख ५९५.९७ कोटींवर पोहोचले. मागील सप्ताहापेक्षा त्यामध्ये ९६, ५४९.७४ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदार कागदोपत्री एवढ्या रकमेने श्रीमंत झाले आहेत.
 

विशेष सत्राने काय साधले?
 

शनिवारी (दि. २) मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये विशेष सत्राचे आयोजन केले होते. एखादे संकट उद्भवले तर वेबसाइटवर केलेली विशेष व्यवस्था योग्य तऱ्हेने कार्यरत होते की नाही याची चाचणी घेण्यात आली. पहिले सत्र हे नेहमीच्या यंत्रणेवर, तर दुसरे सत्र आपत्कालीन यंत्रणेच्या साइटवर चालविले गेले. ही यंत्रणा योग्यप्रकारे कार्यरत असल्याचे निष्पन्न झाल्याने बाजाराची विश्वासार्हता आणखी वाढली. 
 

परकीय वित्तसंस्थांची जोरदार खरेदी 
 

गतसप्ताहात जाहीर झालेली जीडीपीची आकडेवारी ही बाजाराच्या अपेक्षेहून चांगली आल्याने बाजारात तेजी दिसली. यामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांकी धडक दिली. परकीय वित्तसंस्थांनीही खरेदी केली. फेब्रुवारी महिन्यात परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारात खरेदी केली आहे. याआधी जानेवारीत परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारात मोठी विक्री केली.

Web Title: China America will decide the direction of the indian share market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.