America-Iran Crisis: अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या Strait of Hormuz अनेक दिवसांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, संघर्ष काहीअंशी कमी झाल्यामुळे शनिवारी २० पेक्षा अधिक जहाजांनी सुरक्षितपणे होर्मुझ पार केले. शिपिंग अॅनालिटिक्स फर्म Kpler च्या माहितीनुसार, १ मार्चनंतर होर्मुजमधून गेलेल्या जहाजांची ही सर्वाधिक संख्या आहे. या जहाजांमध्ये तेल, गॅस आणि इतर माल वाहून नेणारे मोठे टँकर्स होते.
या मार्गाचे महत्त्व
जगातील सर्वाधिक तेल-गॅस वाहतूक याच मार्गाने होते, त्यामुळे हा मार्ग संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्वाचा आहे. विशेष म्हणजे, भारतात आयात होणारा गॅस आणि इंधन याच मार्गाने येतो, त्यामुळे या संघर्षाचा भारतावर मोठा परिणाम झाला आहे. अशातच, २० जहाजांनी सुरक्षित होर्मुझ पार केल्याने भारताला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
या जहाजांपैकी काहींनी इराणमधील माल (तेल आणि धातू) लोड केला होता, तर तीन जहाजे LPG घेऊन जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, यातील एक जहाज भारताकडे, एक चीनकडे आणि एक भारतीय जहाज यूएईहून सुमारे ७.८ लाख बॅरल कच्चे तेल घेऊन श्रीलंकेकडे रवाना झाले आहे.
इतर देशांची जहाजेही याच मार्गावर
- पनामा ध्वजाखालील Crave: यूएई → इंडोनेशिया (LPG)
- Akti A आणि Athina: बहरीन → मोजांबिक/थायलंड (रिफाइंड तेल)
- Navig8 Macallister: यूएई → दक्षिण कोरिया (नेफ्था -५ लाख बॅरल)
- Fpmc C Lord: सौदी अरेबिया → तैवान (२० लाख बॅरल कच्चे तेल)
- Ruby: कतार → यूएई (खत)
- Merry M: सौदी अरेबिया → इटली (पेट्रोलियम कोक)
अमेरिका-इराण संघर्ष तीव्र
एकीकडे अनेक जहाजांनी सुरक्षित होर्मुझ पार केले, तर दुसरीकडे अमेरिकेने दावा केला आहे की, रविवारीपर्यंत सुमारे २५ इराणी जहाजांना रोखण्यात आले किंवा परत पाठवण्यात आले. याला प्रत्युत्तर देताना इराणने अमेरिकन जहाजांवर ड्रोन हल्ला केल्याचा दावा केला. मात्र या हल्ल्यामुळे नेमके किती नुकसान झाले याची स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांची हालचाल वाढली असली तरी अमेरिका-इराण तणावामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर अनिश्चिततेचे सावट कायम आहे.
