lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीय कंपन्यांनी उभारले आयपीओद्वारे 31 हजार कोटी

भारतीय कंपन्यांनी उभारले आयपीओद्वारे 31 हजार कोटी

चालू वर्षातही चांगली कामगिरी होण्याची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 04:49 AM2021-04-05T04:49:08+5:302021-04-05T04:49:21+5:30

चालू वर्षातही चांगली कामगिरी होण्याची अपेक्षा

31,000 crore through IPOs raised by Indian companies | भारतीय कंपन्यांनी उभारले आयपीओद्वारे 31 हजार कोटी

भारतीय कंपन्यांनी उभारले आयपीओद्वारे 31 हजार कोटी

नवी दिल्ली : जागतिक बाजारांमध्ये उपलब्ध असलेली तरलता आणि देशांतर्गत शेअर बाजारामध्ये असलेली तेजी याचा फायदा घेत भारतीय कंपन्यांनी सन २०२०-२१ मध्ये प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे ३१ हजार कोटी रुपये उभारले आहेत. गेल्या तीन वर्षांमधील ही सर्वाधिक रक्कम आहे. चालू आर्थिक वर्षामध्येही अनेक चांगले आयपीओ येऊ घातले असल्याने हे वर्षही आयपीओसाठी चांगले जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

शेअर बाजाराकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार सन २०२०-२१मध्ये ३० कंपन्यांचे आयपीओ बाजारामध्ये आले होते. त्यामधून या कंपन्यांनी ३१ हजार कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. याशिवाय या वर्षामध्ये येस बँकेने एफपीओच्या माध्यमातून १५ हजार काेटी उभारले आहेत. त्याआधीच्या वर्षामध्ये (सन २०१९-२०) १३ कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून २०,३५२ कोटी रुपये उभारले होते. २०१८-१९ मध्ये १४ कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून उभारलेल्या भांडवलाची रक्कम १४,७१९ कोटी रुपये तर २०१७-१८ मध्ये ८२,१०९ कोटी रुपये भांडवल उभारले गेले होते. या वर्षामध्ये ४५ कंपन्यांचे आयपीओ बाजारात आले होते.
 
आयआयएफएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भारद्वाज यांनी सांगितले की, पुढील वर्षामध्ये अनेक कंपन्या आयपीओच्या माध्यमातून बाजारात येणार आहेत. आतापर्यंत २८ कंपन्यांच्या प्रस्तावांना सेबीची मंजुरी मिळाली आहे. या कंपन्या सदर माध्यमातून २८,७१० कोटी रुपये उभारू इच्छित आहेत. याशिवाय अन्य काही कंपन्यांचे प्रस्तावही नंतर दाखल होऊ शकतात. भारतीय अर्थव्यवस्थेबाबतची अनुमाने बघता आगामी वर्ष आयपीओच्या माध्यमातून येणाऱ्या कंपन्यांना चांगले जाण्याची शक्यता दिसते. 

विविध क्षेत्रांचा समावेश
सरत्या वर्षांमध्ये ज्या कंपन्यांचे आयपीओ आले आहेत त्यामध्ये विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या कंपन्या दागिने बनविणाऱ्या, स्पेशालिस्ट रसायने तयार करणाऱ्या, उत्पादन क्षेत्रातील तसेच बँकिंग आणि वित्तीय सेवा पुरविण्याच्या क्षेत्रातील आहेत.
या वर्षामध्ये एलआयसी, एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेस, एनसीडीईएक्स, ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक यांचे आयपीओ येण्याची शक्यता असल्याचे स्पेक्ट्रम कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र नाईक यांनी सांगितले.

Web Title: 31,000 crore through IPOs raised by Indian companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.