Gensol Engineering Share: घोटाळ्याचा फटका बसलेल्या जेनसोल इंजिनीअरिंगच्या अडचणी वाढत आहेत. कंपनीला इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्यासाठी कर्ज देणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांपैकी एक असलेल्या इरेडानं, कंपनीच्या प्रवर्तकांनी (जेनसोल) त्यांच्या परवानगीशिवाय शेअरहोल्डिंग कमी करून कराराचं उल्लंघन केलं असल्याचं म्हटलंय. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडनं (इरेडा) २४ एप्रिल रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) करारभंगाची तक्रार दाखल केली आहे.
इरेडानं काय म्हटलंय?
'जेनसोल इंजिनीअरिंग लिमिटेड आणि त्याचे प्रवर्तक आणि सहयोगी कंपन्यांशी संबंधित ताज्या घडामोडींनंतर इरेडानं रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि कंपनीच्या योग्य तपासणी प्रोटोकॉलनुसार अंतर्गत आढावा घेण्यास सुरुवात केली आहे,' असं इरेडानं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलंय. जेनसोलचं लोन अकाऊंट सध्या अडकलं आहे, परंतु ते अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) म्हणून टाकण्यात आलेलं नाही. याशिवाय इरेडाच्या चौकशी आणि जोखीम समित्या या प्रकरणाचा बारकाईने अभ्यास करत आहेत. समिक्षेच्या परिणामांच्या आधारे वसुलीसंदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बनावट कागदपत्रांच्या आधारे जेन्सोलला क्रेडिट रेटिंग एजन्सीकडून पत्र मिळाल्याबद्दल बोलताना त्यांनी नमूद केलेली पत्रं जारी केली नसल्यानंही इरेडानं म्हटलं.
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
ईडीची कारवाई
अडचणीत सापडलेल्या जेनसोल इंजिनीअरिंग लिमिटेडवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी छापे टाकून कंपनीचे सहप्रवर्तक पुनीत सिंग जग्गी यांना दिल्लीतील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलं. परकीय चलन व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींनुसार कंपनीच्या दिल्ली, गुरुग्राम आणि अहमदाबाद येथील ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. कंपनीचे प्रवर्तक अनमोल सिंग जग्गी आणि त्यांचे बंधू पुनीत सिंग जग्गी हे सेबीच्या अहवालानंतर फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या चौकशीच्या कक्षेत आहेत.
इरेडाची स्टॉक स्थिती
जेनसोल इंजिनीअरिंग लिमिटेडच्या शेअरमध्ये शुक्रवारी मोठी घसरण झाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी हा शेअर ४.९६ टक्क्यांनी घसरून ९१.०५ रुपयांवर बंद झाला. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर आहे. इरेडाच्या शेअरबद्दल बोलायचं झालं तर तो १६७.४० रुपयांवर बंद झाला. हा शेअर आदल्या दिवसाच्या तुलनेत ४.४० टक्क्यांनी घसरून बंद झाला.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)