lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ठेव ठेवताना कर्जावरील व्याजदराची चौकशी करा

ठेव ठेवताना कर्जावरील व्याजदराची चौकशी करा

‘जादा व्याजदर, जादा धोका’ हे सूत्र जरी गुंतवणुकीच्या मोबदल्या संदर्भात असले, तरी कर्जावरील जादा व्याजदराचा धोका गुंतवणुकीला कसा होतो हे पाहणे गरजेचे ठरेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 11:52 PM2019-12-01T23:52:05+5:302019-12-01T23:52:40+5:30

‘जादा व्याजदर, जादा धोका’ हे सूत्र जरी गुंतवणुकीच्या मोबदल्या संदर्भात असले, तरी कर्जावरील जादा व्याजदराचा धोका गुंतवणुकीला कसा होतो हे पाहणे गरजेचे ठरेल.

Investigate the interest rate on the loan while depositing | ठेव ठेवताना कर्जावरील व्याजदराची चौकशी करा

ठेव ठेवताना कर्जावरील व्याजदराची चौकशी करा

- विद्याधर अनास्कर (बँकिंग तज्ज्ञ)

या लेखाचा मथळा निश्चितच आपणांस विचित्र वाटला असणार, ठेव ठेवणाऱ्या ग्राहकाने ठेवीवरचा व्याजदर विचारणे अपेक्षित व आवश्यक असताना त्याला त्या बँकेतील कर्जांवरील व्याजदर विचारायला सांगणे हे निश्चितच अनाकलनीय वाटणारच; परंतु आपल्या ठेवींची सुरक्षितता तपासण्यासाठी हे आवश्यक आहे. ठेव ठेवताना ठेवीदार नेहमी तीन गोष्टींचा विचार प्रामुख्याने करतो. त्यामध्ये निश्चितच प्रथम तो मोबदल्याचा विचार करतो. त्यावेळी जेथे जास्त व्याजदर त्याला मिळतो, तेथे मोबदल्याच्या दृष्टिकोनातून त्या बँकेची निवड ही नैसर्गिक ठरते; परंतु त्याचबरोबर ‘तरलता’ व सुरक्षितता यांचाही विचार महत्त्वाचा ठरतो. ‘तरलता’ याचा अर्थ जेव्हा पाहिजे तेव्हा पैशाची उपलब्धता सर्वा$ंत महत्त्वाचा घटक म्हणजे सुरक्षितता होय. सुरक्षिततेच्या निकषासाठी सुरक्षित बँक निवडणे आवश्यक ठरते. अशा सुरक्षित बँकनिवडीसाठी बँकिंग व्यवसायातील आर्थिक सुरक्षिततेचे निकष सर्वसामान्यांना माहीत असणे जरी गरजेचे असले, तरी प्रत्यक्षात मात्र हे निकष सर्वसामान्यांना माहीत नसतात ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी कर्जावरील व्याजदराची चौकशी ही व्यावहारिक व ढोबळमानाने प्राथमिक निर्णय घेताना मदतगार ठरते.

ज्या बँकेतील कर्जांवरील व्याजदर हे बाजारातील व्याजदरापेक्षा जास्त असतात. त्या संस्थेतील गुंतवणूक धोकादायक समजावी. ‘जादा व्याजदर, जादा धोका’ हे सूत्र जरी गुंतवणुकीच्या मोबदल्या संदर्भात असले, तरी कर्जावरील जादा व्याजदराचा धोका गुंतवणुकीला कसा होतो हे पाहणे गरजेचे ठरेल. आपली ठेव सुरक्षित असते ती बँकेने केलेल्या गुंतवणुकीवर. बँका आपल्याकडील ठेवींची गुंतवणूक कर्जामध्ये, दुसºया बँकांमधील ठेवींमध्ये व शासकीय कर्जरोख्यांमध्ये करत असतात. बँकांनी केलेली गुंतवणूक जोपर्यंत सुरक्षित आहे, तोपर्यंत त्या बँकेमध्ये आपण केलेली गुंतवणूक सुरक्षित राहणार हे सत्य आहे. चांगले कर्जदार म्हणजे, कर्जाची नियमित परतफेड करू शकण्याची आर्थिक क्षमता असणारे कर्जदार नेहमी स्पर्धात्मक वातावरणात कमीत कमी व्याजदराने कर्जसुविधा कोठे उपलब्ध होते ते शोधत असतात.

चांगल्या बँकादेखील अशाच कर्जदारांच्या शोधात असतात. असे कर्जदार स्वत:च्या ट्रॅकरेकॉर्डवर व्याजाबरोबरच इतर अनेक सवलती बँकांकडून मिळवतात; परंतु ज्या कर्जदारांची आर्थिक सक्षमता योग्य नाही, अथवा ज्यांना स्पर्धात्मक वातावरणात इतर बँकांनी नाकारलेले आहे, असे कर्जदार जादा व चढ्या व्याजदराने कर्ज घेण्यास परिस्थितीच्या रेट्यानुसार तयार होतात, परंतु अशा चढ्या व्याजदराने घेतलेल्या कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी अपेक्षित असणारे उत्पन्न राजमार्गाने व सचोटीने केलेल्या व्यावसायातून मिळवणे अवघड ठरते. समजा एखाद्या कर्जदाराने सध्याच्या काळात द.सा.द.शे. १८ टक्के दराने कर्ज घेतले असेल, तर सदर व्यावसायिकाला एवढे जादादराचे व्याज, कर्जाचा हप्ता याबरोबरच सेवकांचा पगार खेळत्या भांडवलाच्या किमान ३ टक्के प्रशासकीय खर्च किमान २ टक्के व निव्वळ नफा किमान १ टक्के असे एकूण खेळत्या भांडवलाच्या ६ टक्के इतके उत्पन्न मिळविणे आवश्यक आहे.

स्वत:चा नफा आणि कर्जाच्या मुद्दलाच्या परतफेडीसाठी आवश्यक असणारे उत्पन्न विचारात घेता कोणत्याच कायदेशीर व राजमार्गाने केलेल्या व्यवसायात इतके उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळे कालांतराने असे जादा व्याजदराने घेतलेली कर्जे थकीत होतात. अशा थकीत कर्जांकरिता नफ्यातून कराव्या लागणाºया तरतुदींमुळे बँकांना तोटा सहन करावा लागतो व जेव्हा हा तोटा बँकेच्या भांडवलापेक्षा म्हणजेच स्व-निधीपेक्षा जास्त होतो, तेव्हा ठेवीदारांच्या ठेवींना धोका उत्पन्न होतो. कर्जांवरील व्याजदर कमी असणाºया आर्थिक संस्थांच्या कर्जदारांचा दर्जा हा निश्चितच चांगला असतो. त्यामुळे जेथे कर्जाचे व्याजदर वाजवी असतात, तेथे ठेवींवरील व्याजदरही वाजवीच असणार. कारण, कर्जवाटपातून मिळणारे उत्पन्न व ठेवींवरील व्याजांवर बँकांना करावा लागणारा खर्च या दोहोंमधील दुरावा जेवढा जास्त तेवढी त्या बँकेची नफाक्षमता जास्त समजली जाते. थोडक्यात ‘जास्त व्याजदर, जास्त धोका’ हे तत्त्व आर्थिक गुंतवणुकीमध्ये ढोबळमानाने गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

बाजारामध्ये दोन प्रकारचे गुंतवणूकदार असतात. पहिल्या प्रकारात आर्थिक बाजारावर बारीक लक्ष ठेवून जास्तीत जास्त मोबदला कमाविण्याच्या एकमेव उद्देशाने आपली गुंतवणूक सतत हलती ठेवणारे गुंतवणूकदार मोडतात. तर, दुसºया प्रकारात आपल्या आयुष्याची पुंजी विश्वासावर कोठे तरी गुंतवणूक ठराविक उत्पन्नाच्या आशेने गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मोडतात, असे गुंतवणूकदार जवळ जवळ ८० टक्के असून, त्यांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. कारण, हे गुंतवणूकदार म्हणजे सामान्य जनता आहे. या सामान्य गुंतवणूकदारांना बाजारात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय आहेत, त्यांमध्ये बँकांबरोबरच पोस्टआॅफिस, भांडवली बाजार, खासगी कंपन्या, सरकारी कंपन्या, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, म्युच्युअल फंड, व्हेंचर कॅपिटल, असे कितीतरी पर्याय उपलब्ध असले, तरी यासंदर्भात जास्त माहिती नसल्याने बहुसंख्य गुंतवणूकदार हे बँकांचीच निवड करताना दिसतात. यामागे खासगी कंपन्यांमधील गुंतवणूक असुरक्षित वाटणे, सरकारी कंपन्या व कर्जरोख्यांमध्ये मिळणारा कमी परतावा व तरलतेच्या दृष्टीने अयोग्य ठरणे, इतर गुंतवणुकीबाबतचे कमी ज्ञान असणे इ. कारणे आहेत.

या पार्श्वभूमीवर सध्या तरी बँकांमधील गुंतवणूकच सुरक्षितता, मोबदला व तरलता या तिन्हींच्या दृष्टीने गुंतवणूकदारास योग्य वाटते. त्यातही केवळ सुरक्षिततेच्या दृष्टीने राष्ट्रीयिकृत बँका इतर व्यापारी बँका व सहकारी बँका असा क्रम लागतो; परंतु मोबदला व सुरक्षितता यांचा एकत्रित विचार करून योग्य समन्वय साधायचा ठरविल्यास सहकारी बँका, इतर व्यापारी बँका व राष्ट्रीयिकृत बँका असा क्रम लागतो. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ज्या बँकेची भांडवल पर्याप्तता ९ टक्क्यांवर आहे, ठेव्यांच्या कर्जांचे ठेवींशी असलेले प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा जास्त नाही, ज्यांच्या अनुत्पादक कर्जांचे प्रमाण १० टक्क्यांच्या आत आहे, ज्यांच्या नफ्याचे प्रमाण खेळत्या भांडवलाच्या १ टक्के आहे व ज्यांना लेखापरीक्षणात सतत ‘अ’ वर्ग आहे अशा बँका गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानल्या जातात. बँकांमधील असलेल्या ठेवींना सध्या असलेले रु. १ लाखाचे विमा संरक्षण हे वाढविले जाण्याची शक्यता असली, तरी धोका नष्ट करण्याच्या दृष्टीने आपल्या ठेवी जर चांगल्या सहकारी बँकांमधून विभागून ठेवल्या तर मोबदला, सुरक्षितता व तरलता या तिन्ही गोष्टी साध्य होतील.

आजपर्यंत कमी झाले नव्हते इतके बचतीवरील व्याजाचे दर कमी म्हणजे ३ टक्के ते ३.२५ टक्क्यापर्यंत आले आहेत. व्याजाचे दर कमी होऊनही मंदीचे सावट दूर होत नाही. कारण, कर्जांवरील व्याजदर हा एकच घटक उत्पादन प्रक्रियेत नाही. प्रत्यक्ष मालमत्तेतील गुंतवणूक कमी झाल्याने आर्थिक मालमत्तेतील गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे कर्जाचे जास्तीत जास्त वाटप करण्याच्या दृष्टीने कमी दुराव्यामध्ये (मार्जिन) कर्जे उपलब्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर बँकांमधील गुंतवणुकीसंदर्भात ‘जास्त व्याज, जास्त धोका’ हे तत्त्व योग्य ठरत असले, तरी कर्जावरचे व्याजदर कमी दाखवून इतर मार्गाने उत्पन्न कमावण्याच्या वृत्तीमुळे कर्जावरील प्रत्यक्षातील व्याजदर ठरवताना कोणकोणत्या घटकांचा अभ्यास जरुरीचा ठरतो, ते पुढील लेखात आपण पाहूयात.

- कोणतीही गुंतवणूक धोकाविरहित नसतेच, धोका हा जरी टाळता येत नसला, तरी तो कमीत कमी ठेवणे हे प्रत्येक गुंतवणूकदाराच्या हातात आहे. नेहमी म्हणतात की, लाभ आणि लोभ यात एका मात्रेचा फरक आहे; मात्र यातील धोका खूप मोठा आहे. वाजवी व्याजदराने केलेल्या गुंतवणूकीद्वारे आपण धोक्याची शक्यता कमीत कमी करतो.

Web Title: Investigate the interest rate on the loan while depositing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.