Vidhan Sabha 2019: खामगाव मतदारसंघात तिहेरी लढतीची शक्यता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 13:32 IST2019-09-19T13:27:16+5:302019-09-19T13:32:39+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - खामगाव विधानसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे.

Vidhan Sabha 2019: खामगाव मतदारसंघात तिहेरी लढतीची शक्यता!
खामगाव: खामगाव विधानसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पार्टीकडून बुलडाणा येथे इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये विद्यमान आमदार अॅड. आकाश फुंडकर हे मुलाखत देणारे एकमेव उमेदवार होते. दुसरीकडे काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ दिसत आहे. काँग्रेसतर्फे माजी आमदार दिलिपकुमार सानंदा हे जरी तिकिटावर दावा करीत असले तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अमरावती विभागीय समन्वयक धनंजय देशमुख व बुलडाणा जिल्हा काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहाण हे सुद्धा काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्यासाठी तयारी दर्शवली आहे. पक्षक्षेष्ठींनी संधी दिल्यास निश्चित निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यादृष्टीने त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न सुरु केले आहेत.
याशिवाय तेजेंंद्रसिंह चौहाण यांच्याप्रमाणेच त्यांच्या सुविद्य पत्नी राजकुमारी चौहाण यांनी सुद्धा जिल्हा काँग्रेस कमिटीकडे मुलाखत दिली आहे. याशिवाय हार्दीक पटेल यांचे निकटवर्तीय तथा किसान क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष मंगेश भारसाकळे यांनी देखील निवडणूकीसाठी तयारी सुरु केली असून काँग्रेसतर्फे मुलाखत दिली आहे. काँग्रेसमधील उमेदवारांच्या स्पर्धेमुळे माजी आमदार दिलिपकुमार सानंदा यांच्यासमोरील अडचणी वाढल्या असल्याची चर्चा रंगली आहे.
‘वंचित’चा उमेदवार ठरणार निर्णायक!
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने हे सुद्धा खामगाव मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. वंचिततर्फे जर अशोक सोनोने निवडणूक रिंगणात असले तर काँग्रेसच्या उमेदवारांसमोर अडचणी वाढू शकतात. त्यामुळे ‘वंचित’कडून अशोक सोनोने उभे राहत असल्यास निवडणूक लढवायची की नाही ? हा विचार काँग्रेसचे उमेदवार करीत आहेत.
राष्ट्रवादीचा उमेदवारही तयारीत !
माजी आमदार नाना कोकरे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. ते १९९०-९५ व १९९५-९९ या कार्यकाळात आमदार राहिलेले आहेत. त्यांनी दोन्ही भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक लढविली आहे. स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्यासोबत खटके उडाल्यानंतर त्यांनी भाजपा सोडली. यावेळेस त्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे.