Vidhan Sabha 2019: मातृतीर्थात राष्ट्रवादी, शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 02:12 PM2019-09-19T14:12:02+5:302019-09-19T14:13:06+5:30

बुलडाणा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाची वेगळी ओळख आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019 : Nationalist, Shiv Sena's battle for existence in the motherland | Vidhan Sabha 2019: मातृतीर्थात राष्ट्रवादी, शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई  

Vidhan Sabha 2019: मातृतीर्थात राष्ट्रवादी, शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई  

Next

- सोहम घाडगे

बुलडाणा - जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाची वेगळी ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सलग चार वेळेस या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. गतवेळची निवडणूक त्यांनी लढवली नाही. मात्र आगामी विधानसभेच्यादृष्टीने त्यांनी जोमाने तयारी सुरू केली आहे. आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी भूमीपूजनाचा धडाका लावला आहे. पाच वर्षांत विकासकामे केल्याचे सांगत त्यांनी दौरे सुरू केले आहे.त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

माँ जिजाऊंचे जन्मस्थळ आणि विदर्भ - मराठवाड्याच्या सीमा जोडलेल्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाकडे यंदा जिल्ह्याच्या नजरा लागलेल्या आहेत. या मतदारसंघात ३ लाख ११ हजार २६६ मतदार आहेत. त्यामध्ये १ लाख ६३ हजार १०४ पुरुष तर १ लाख ४८ हजार १६५ स्त्री मतदार आहेत. लोकसभेनंतर विधानसभेसाठी १ हजार ५३५ मतदार वाढले आहेत. वाढलेले नवीन मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान गेली निवडणूक न लढविलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. काँग्रेस -राष्ट्रवादीचे आघाडीचे गणित जमल्याने त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र युती संदर्भात भाजप, सेनेचे अजून तळयात मळ्यात असल्याने समीकरणे बदलू शकतात. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे तर आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर सध्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोनच पक्षात नेते, कार्यकर्त्यांचे इनकमिंग, आऊटगोईंग सुरु आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रामप्रसाद शेळके यांनी मंगळवारी मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे. निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसमधील एका बड्या नेत्याचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. राजकीय भवितव्य व आपली जागा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने अनेकजण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी आणखी उलथापालथ या मतदारसंघात बघायला मिळणार आहे.

सध्यातरी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावरही टीकास्त्र सोडले जात आहेत. आपल्या नेत्याची प्रतिमा कशी चांगली व दुस-याची कशी वाईट हे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपमधील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी यांची भूमिका शिवसेनेच्या बाजूने दिसून येत आहे. मात्र ऐनवेळी युतीचे गणित फिस्कटले तर भाजपच्या उमेदवारीसाठीही तगडी स्पर्धा बघायला मिळेल. तुर्त भाजपच्या गोटात शांतता असली तरी स्वबळाची चाचपणी भाजपने आधीच केली आहे. वंचितकडूनही येथे काही नावे सध्या चर्चेत येत असून प्रत्यक्षात येथे वंचितची उमेदवारी कोणाच्या गळ््यात पडते, यावरही अनेक गणिते अवलंबून आहेत.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 : Nationalist, Shiv Sena's battle for existence in the motherland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.