कामाचा ताण सोसवेना; आरोग्य विभागात ४५६ पदे रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 13:37 IST2024-12-28T13:34:52+5:302024-12-28T13:37:03+5:30
अपुऱ्या मनुष्यबळावर रुग्णसेवेचा डोलारा : शासन पदभरती करणार काय?

Work stress cannot be tolerated; 456 posts vacant in the health department
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची एकूण १०५४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५९८ पदे भरलेली असून, ४५६ पदे रिक्त आहेत. परिणामी, रुग्णसेवेवर विपरीत परिणाम जाणवत आहे. शासन व प्रशासनाने तातडीने दखल घेत पदभरती करण्याची आवश्यकता आहे.
भंडारा जिल्ह्यात ७ ग्रामीण रुग्णालये, ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १९३ उपकेंद्रे, २९ आयुर्वेदिक दवाखाने, ४ आंग्ल दवाखाने व तालुकास्तरावर ७ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालये आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचारी, तंत्रज्ञ, शिपाई आदींची पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आरोग्यसेवा प्रभावित होत आहे. विविध प्रकारचे लसीकरण, आजारांची नोंद व औषधोपचार, रोगप्रतिबंधक कामे, आरोग्यविषयक जनजागृती, आरोग्य शिक्षण, गर्भवती स्त्रिया व विद्यार्थ्यांची तपासणी, सरकारच्या विविध योजना तळागाळात पोहोचवणे आदी कामे रिक्त पदांमुळे प्रभावित होत आहेत.
जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या माध्यमातून गावस्तरावर ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना आरोग्यसेवा पुरविली जाते. आरोग्य कर्मचाऱ्यांना नियमित बीसीजी, गोवर, हिपॅटायटिस बी, पोलिओ, डांग्या खोकला, घटसर्प, जीवनसत्त्व अ, जंतनाशक मोहीम, राष्ट्रीय कार्यक्रम, कुटुंब कल्याण, शालेय आरोग्य तपासणी, अंगणवाडी, गर्भवती माता क्षयरोग, कुष्ठरोगींची नियमित तपासणी, असंसर्ग आजारांच्या तपासण्या, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आदी कामांचे नियोजन नेहमी सुरू असते. यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे.
रिक्त पदांचा बॅकलॉग भरणार केव्हा?
भंडारा जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी प्रथम श्रेणी आदींसह अनेक अधिकाऱ्यांची महत्त्वाची पदे रिक्त आहेत. यासह एकूण ४५६ पदे रिक्त आहेत. काही महिन्यांपूर्वी अनेक जण निवृत्त झाल्याने रिक्त पदांचा बॅकलॉग वाढणार आहे.
हेल्थ वर्कर, परिचारिकांची २४७ पदे रिक्त
आरोग्य विभागात मल्टीपर्पज हेल्थ वर्करची ८५, सहायक परिचारिकेची १६२, अशी तब्बल २४७ पदे रिक्त आहेत. या कर्मचाऱ्यांची क्षेत्रीय स्तरावर लसीकरण, शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसार, तपासणी, लसीकरण यात त्यांची मोलाची भूमिका असते. मात्र, रिक्त पदांमुळे आरोग्यसेवेचे आरोग्य बिघडले आहे. शहरातील महागडे उपचाराचा भुर्दंड सहन होणारा नसल्याने नागरिकांना नाइलाजाने शासकीय रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.
रिक्त पदे
प्रथम श्रेणी २२ पदे
सहायक वैद्यकीय अधिकारी २६
सांख्यिकी तपासणीस १
मल्टीपर्पज हेल्थ वर्कर ८५
आरोग्य सहायक ३
अधिपरिचारिका १६२
आरोग्य सहायिका ८
आरोग्य पर्यवेक्षक २
फार्मासिस्ट ७
शिपाई ८०
सफाई कर्मचारी १७
पीटीएलएची ५०
एकूण रिक्त पदे ४५६
"आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात आरोग्यसेविका व शिपायांची पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी पदेही रिक्त आहेत. यावर उपाय म्हणून कंत्राटी कर्मचारी व डॉक्टरांची सेवा पुरविली जात आहे."
- डॉ. मिलिंद सोमकुवर, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा.