घरगुती भांडणातून महिलेची हत्या, पती फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 12:31 IST2023-06-22T12:29:21+5:302023-06-22T12:31:37+5:30

वरठी येथील घटना

Woman killed in domestic dispute, husband absconding | घरगुती भांडणातून महिलेची हत्या, पती फरार

घरगुती भांडणातून महिलेची हत्या, पती फरार

वरठी (भंडारा) : मोहाडी तालुका हत्या व आत्महत्येच्या घटनांनी हादरला आहे. सासऱ्याकडून सुनेचा खून, रेल्वेखाली महिलेची आत्महत्या या घटनांपाठोपाठ एकलारी येथील एका महिलेचा खून झाल्याची घटना घडली. तिच्या हत्येचा संशय पतीवर असून, सध्या तो फरार आहे. वेणूबाई बालपांडे (५५) असे मृत महिलेचे नाव असून, वरठी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली असावी. ती बुधवारी सकाळी उघडकीस आली.

एकलारी - वरठी रस्त्यावर कंठीराम बालपांडे यांचे घर आहे. त्यांना दोन मुलगे व एक मुलगी असून, एक मुलगा पुणे येथे नोकरीला असून, मुलगी पतीसोबत वरठी येथे राहते. मृत वेणूबाई व पती कंठीराम हा लहान मुलासोबत एकलारी येथे राहतो. घटनेच्या दिवशी लहान मुलगा त्याच्या बहिणीकडे होता. रात्री पती-पत्नीत शुल्लक कारणावरून भांडण झाल्याची माहिती मिळाली. यात लोखंडी रॉडने महिलेच्या डोक्यावर प्रहार केल्याने ती गतप्राण झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील, हवालदार नितीन भालाधरे व नीलेश चौधरी करत आहेत.

पोलिस निघाले आरोपीच्या शोधात

मृत महिलेच्या लहान मुलाचे वरठी येथे कापडाचे दुकान असून, तो नेहमी बहिणीकडे थांबायचा. घटनेच्या दिवशी रात्री १० वाजताच्या सुमारास घरून जेवण करून बहिणीकडे झोपायला आला. सकाळी पुन्हा घरी गेल्यावर घराला कुलूप दिसले. त्याने आजूबाजूला माहिती घेतली, पण माहिती न मिळाल्याने पुन्हा घरी जाऊन पाहिले असता, आई निपचित रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. खून करून आरोपी कंठीराम पसार झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. घटनास्थळावर लोखंडी रॉड सापडला आहे.

Web Title: Woman killed in domestic dispute, husband absconding