धान रोपणी करताना सर्पदंशाने महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 16:59 IST2024-07-20T16:58:41+5:302024-07-20T16:59:26+5:30
Bhandara : लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

Woman dies of snakebite while planting paddy
देवानंद नंदेश्वर
भंडारा : धान रोवणी करीत असलेल्या ६५ वर्षीय महिलेला विषारी सापाने दंश केल्याने त्यांचा लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दैतमांगली शेतशिवारात घडली.
गुणाबाई नत्थुजी मने (६५, सावरी मुरमाडी, ता. लाखनी) असे मृत महिलेचे नाव आहे. गुणाबाई मने शनिवारी महिलांसोबत रोवणी करण्यासाठी दैतमांगली येथे गेल्या होत्या. रोवणी करीत असताना दुपारच्या सुमारास एका विषारी सापाने त्यांना दंश केला. त्यानंतर तातडीने ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे त्यांना हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवार (दि. २१) सकाळी ११ वाजता सावरी मुरमाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल. सैन्य दलात कार्यरत चितेश मने यांच्या त्या आई होत.